भगवंताने ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यात वैविध्य निर्माण केले. कारण तो खरा रसिक आहे. अन्यथा त्याने एकच फुल , एकच भाजी, एकच रंग, एकसारख्या विचारप्रवाहाची माणसं बनवून सृष्टी निरुत्साही बनवली असती. परंतु तसे झाले नाही, ज्या अर्थी त्याने एवढे वैविध्य निर्माण केले, त्याअर्थी तो वैविध्यप्रिय आहे. ही विविधता अगदी धर्म, पंथ यांच्या बाबतीतही लागू होते. त्यामुळे कोणताही एक धर्म श्रेष्ठ आणि अन्य कनिष्ठ होत नाही. सर्व धर्मांची विचारधारा आनंद निर्माण करणारी आहे आणि ती भगवंताला प्रिय आहे. तो जर हे वैविध्य स्वीकारायला तयार आहे, तर आपण त्यांचे अस्तित्व नाकारणारे कोण?
ते म्हणतात, `लोकांना धर्म, पंथ, अध्यात्म हे काहीतरी गुढ आहे असे वाटते. या विषयांबद्दल जेवढे धीरगंभीर चेहरे तेवढे लोक कर्मठ मानले जातात. परंतु धर्माचे हे रूप नाहीच! आई वडिलांना मुले जशी हसती खेळती आवडतात, तशी भगवंतालाही प्रसन्न, आनंदी, मजेने जगणारे लोक आवडतात. ज्यांना आनंदाने आयुष्य जगता आले, त्यांना अध्यात्म कळले, असे म्हणता येईल! उगीचच ओढलेले, ताणलेले, आक्रसलेले चेहरे आपल्याला आवडत नाहीत, तर देवाला तरी कसे आवडणार? हीच सर्व धर्माची शिकवण आहे. आनंदाने जगा आणि जगू द्या.'
'अध्यात्म ही मानवी ऊर्जेशी संबंधित आहे. अध्यात्म माणसांना जोडते. आपल्या देशात, जगात विविध धर्म, पंथ असले तरी त्यांची शिकवण हीच आहे. 'धर्मो धारयते प्रजा' अर्थात धर्म समाजाला संघटित ठेवतो, अपेक्षांचे ओझे मनावर न ठेवता कर्तव्याची जाणीव करून देतो. आनंदाने जगायला शिकवतो. याचे भान ज्या व्यक्तीला असते, ती खरी अध्यात्मिक व्यक्ती असते. अशीच एक आठवण सांगतो -
इराकमध्ये तणावाची स्थिती असताना मी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावर तेथे गेलो होते. इंग्लंडचे पंतप्रधान रेड झोनमध्ये थांबले होते व तेथेच बॉम्बस्फोट झाला होता. मला तेथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था देण्यात आली होती. परंतु मला रेड झोनमध्ये जायचे होते. तेथे जिद्द करून गेल्यानंतर तेथील लोकांनी माझे स्वागत केले. मी त्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पहिल्यांदाच आम्हाला कुणी ऐकून घेत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विरोधी गटातील आठ हजार कुटुंबीयांची हकालपट्टी केली होती. दुसऱ्या दिवशी मी विरोधी गटातील प्रतिनिधींना रेड झोनमध्ये घेऊन गेलो. अगोदर चर्चेदरम्यान वाद झाले, पण मग ते मध्यस्थीतून शांत झाले. तो इराकसाठी टर्निंग पॉईंट ठरला व आठ हजार कुटुंबीय स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला. हेच अध्यात्म आणि हीच अध्यात्माची शिकवण!