हरिपाठाच्या सुरुवातीला दोन मुख्य अभंग म्हटले जातात. त्यातला एक आहे ध्यानाचा आणि दुसरा आहे रूपाचा! ते अभंग म्हणजे 'सुंदर ते ध्यान' आणि 'रूप पाहता लोचनी'. या अभंगात सुंदर ध्यान या अभंगाला ध्यानाचा आणि रूप पाहता लोचनी या अभंगाला रूपाचा अभंग म्हटले आहे. मात्र त्यातील वर्णन नीट ऐकले, तर ते परस्परविरुद्ध आहे, हे आपल्याला लक्षात येईल. सुंदर ते ध्यान हा ध्यानाचा अभंग असून त्यात पांडुरंगाच्या रूपाचे वर्णन आढळते, तर रूप पाहता लोचनी अभंगात पांडुरंगाकडे ध्यान लावल्यावर होणारा आनंद व्यक्त केला आहे. याचाच अर्थ रूप आणि ध्यान या दोन्ही गोष्टी नामावर अवलंबून आहेत.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, 'नाम आधीही होते आणि नंतरही राहणार आहे. नाम रुपाला व्यापून असते. राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकींनी रामायण लिहिले होते. रामाने मागाहून जन्म घेऊन तसे आचरण करून दाखवले. म्हणजेच राम अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते आणि रामाच्या अस्तित्वानंतरही नाम शिल्लक राहिले. म्हणजे नाम हे देश काल मर्यादेच्या पलीकडे असते आणि रूपापेक्षा सत्य असते. म्हणून रूपापेक्षा नामाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.
एखाद्या व्यक्तीचे नाव काढताच आपल्याला त्याचे रूप डोळ्यासमोर येते. पण कधी? जेव्हा त्या व्यक्तीला आपण पाहिलेले असते. मात्र, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतही नाही, तेव्हा आपण आधी नाम विचारून घेतो आणि मग रूप पाहण्याचा प्रयत्न करतो.
सगुण भक्ती करताना देवाचे नाम घेताच आपल्या डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती उभी राहते. परंतु निर्गुण भक्तीत सर्वव्यापी परमेश्वर ही संकल्पना मानली जाते. सगुण भक्ती कशासाठी, तर आपले चित्त भक्तीमार्गात स्थिर व्हावे, यासाठी! ज्याप्रमाणे गणिताची उकल करताना आपल्याला 'क्ष' ची मदत होते. त्याप्रमाणे अध्यात्माची उकल करताना भगवंताची मूर्ती अर्थात त्याचे रूप किंवा ध्यान डोळ्यासमोर ठेवण्यास मदत होते. मात्र गोंदवलेकर महाराज सांगतात, रूपाचा विचार करताना मन त्यात अडकते, रूपाच्या पलीकडे असलेला परमेश्वर पाहायचा असेल, तर नामाला पर्याय नाही. म्हणून रूप डोळ्यासमोर असो न असो, सर्वत्र व्यापून राहिलेल्या परमेश्वराला साक्षी ठेवून नामस्मरण सुरू करा.