शनिची दृष्टी उग्र आहे असे म्हणतात. शनि हा ग्रहदेखील तप्त गोळा आहे. त्या ग्रहावरून शनिचे रूप आणि त्या ग्रहाचा स्वभाव उग्र असल्याचे म्हटले जात आहे. त्याची उग्र दृष्टी आपल्यावर थेट पडू नये, म्हणून शनिदेवाचे दर्शन बाजूने घ्यावे असे आपले पूर्वज सांगत असत. शास्त्रामध्ये या गोष्टीला कुठेही आधार नाही, ही केवळ तर्कातून सांगितली जाणारी बाब आहे.
शनि देवाच्या सेवेत काही उणे दुणे राहू नये, म्हणून अनेक भाविक त्याचे दर्शन घेणे टाळतात आणि पर्यायी व्यवस्था म्हणून हनुमंताचे दर्शन घेतात. विशेषत: ज्यांची साडेसाती सुरू असते, असे भाविक शनि मंदिरापेक्षा हनुमान मंदिरात रांग लावताना दिसतात.
शनिदेवाला मारुती प्रिय असल्याने मारुतीची उपासना केली तरी ती शनिदेवाला पोहोचते, असे शनिमहात्म्यात दिले आहे. याचा अर्थ शनिदेवाचे दर्शन टाळणे सयुक्तिक ठरत नाही. साडेसातीत शनीची उपासना करणे, दर्शन घेणे, दर शनिवारी अभिषेक करणे, शनिस्तोत्र म्हणणे, मंत्रजप करणे हे उपाय अधिक प्रभावी ठरतात. उपासनेत उणिवा राहिल्या तरी भिती बाळगण्याचे कारण नाही, कारण अल्पमती, यथाशक्ती केलेली पूजा शनिदेवांपर्यंत अवश्य पोहोचते.
उपासनेने संकटाची, त्रासाची तीव्रता कमी होते. ते सोसण्याचे धैर्य येते. म्हणून `उपासनेला दृढ चालवावे' असे समर्थ रामदास स्वामी म्हणत असत. उपासनेला शनी मंदिर जवळ नसले, तर मारुतीच्या मंदिराचा पर्याय निवडून उपासना पूर्ण करता येते. त्याचप्रमाणे साडेसातीकाळात महादेवाची उपासनाही फलदायी ठरते. कारण शनीसुद्धा रुद्राची उपासना करत असत.