वर्षातून असे कितीतरी सण आहेत की ते साजरे करताना त्याच्यामागील शास्त्रीय व वैज्ञानिक मीमांसा न पाहता केवळ 'गतानुगतिको लोक:' या अंधपरंपरेने ते साजरे केले जाते. अर्थात असे करताना ओढाताण व मनस्ताप होत नसेल तर फारशी हरकत येणार नाही. पण कित्येक वेळा १४ भाज्या, ५६ भोग, १२१ मोदक वगैरे संख्येचा बागुलबुवा डोळ्यासमोर सतत नाचत असल्यामुळे त्या संख्येत थोडी जरी कमतरता झाली तरी मनाला अस्वस्थता लागते. कार्याची गोडी नष्ट होते. परंतु, तेवढ्याशा बदलाने कुळाचारात उणीव राहते का? ते जाणून घेऊ.
Ganesh Festival 2021 : शास्त्रानुसार गणेशमूर्तीचे विसर्जन कितव्या दिवशी करणे योग्य ठरते, ते वाचा!
कोणत्याही धार्मिक आचारात किंवा व्रतात पूजा, होम, दान, संतर्पण इ. अंगांचे महत्त्व असते. त्यामुळेच प्रत्येक कार्याचा संकल्प करताना `यथालाभद्रव्यै, यशाज्ञानेन, यथाशक्ती' अशी शब्दयोजना केली जाते. श्रद्धा आणि भक्ती बाळगून आपल्या आर्थिक परिस्थितीला झेपेल अशा पद्धतीने विधी साजरे करायचे असतात.
मात्र उपलब्धी आणि सामर्थ्य असताना हात आखडता घेऊ नये. यथायोग्य विधी करावेत, दान धर्म करावा, अन्नदान, वस्त्रदान करावे. मात्र ऋण काढून सण करा, असे धर्मशास्त्रात कुठेही सांगितलेले नाही. त्यामुळे एखादे व्रत अंगिकारताना पूर्ण विचार करून वसा घ्यावा आणि त्यात खंड पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. मात्र कोणत्याही आर्थिक, शारिरीक, मानसिक दडपणाखाली धर्माचे पालन करणे अभिप्रेत नाही.
यम नियमाची बंधने मनुष्याला शिस्त लागावी म्हणून घातलेली आहेत. नियमांची चौकट नसेल तर मनुष्याच्या वर्तनाला धरबंध राहणार नाही. यासाठी धर्मशास्त्राने समाजातील सर्व स्तरांचा विचार करून त्या त्या प्रसंगानुसार उत्सव, व्रतांची आखणी केली आहे. त्यात कालानुरूप बदल करण्यात गैर काहीच नाही. परंतु हे बदल शास्त्राला, धर्माला अनुकूल ठरतील व त्यांच्या पावित्र्याला धक्का बसणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेतली गेली पाहिजे.