शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

'अंध विद्यार्थ्यांसमोर कालिदासांच्या मेघदूताचे वर्णन करणे ही माझी परीक्षा होती!' - निवेदिका धनश्री लेले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 5:37 PM

महाकवी कालिदास यांच्या मेघदूताची तोंडओळख करून घ्यायची असेल तर ही धनश्री लेले यांची मुलाखत आवर्जून वाचा!

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

'मेघदूत'....काय जादू आहे ह्या काव्यखंडात? आषाढाच्या मुहूर्तावर ह्या काव्यखंडाच्या पहिल्या श्लोकाची पहिली ओळ 'आषाढस्य प्रथम दिवसे' आपसुक ओठावर येते. कवी कुसुमाग्रज तर म्हणतात, 'मला जर कधी काळी निर्जन बेटावर जावे लागले आणि सोबत फक्त एकच पुस्तक न्यायची परवानगी मिळाली तर मी 'मेघदूत' निवडेन.' कवि कालिदासांचा मूळ काव्यखंड संस्कृतात आहे. त्याची एवढी मोहिनी आहे, की आजवर अनेकांना याबद्दल बोलण्याचा, लिहिण्याचा मोह आवरला नाही.  रा.प.सबनीस, कृष्णशास्त्री चिपळूणकर, डॉ.श्रीखंडे, ग.वि.कात्रे, ना.ग.गोरे, वसंतराव पटवर्धन, बा.भ.बोरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, द.वें.केतकर, अ.ज.विद्वांस, चिंतामणराव देशमुख ह्यांनी मराठीतून मेघदूताचा काव्यानुवाद, भावानुवाद केला आहे. तेही न वाचलेल्या नव्या पिढीला, ह्या अजरामर साहित्याची ओळख व्याख्यानातून करून देतात देतात आघाडीच्या निवेदिका धनश्री लेले! 

धनश्री ताई सांगतात, 'मेघदूत काय आहे, तर एका प्रेमीयुगुलाची विरहकथा! मेघदूताचे कथाबीज अगदी छोटेसे आहे. एक कोणी यक्ष स्वत:च्या कर्तव्यात चुकला म्हणून कुबेराने त्याला शाप दिला. तो भोगण्यासाठी यक्ष एक वर्षभर रामगिरीवर येऊन राहिला. त्याला आपल्या प्रिय पत्नीचा विरह सहन होत नाहीये. आठ महिने संपले, उरले होते फक्त चार महिने. पण हे चार महिने काढणे त्याला कठीण जात आहे. का? तर हे चार महिने होते पावसाळ्याचे. तन-मनाने अधीर झालेला यक्ष पत्नीच्या भेटीसाठी कासावीस झाला आहे. पत्नीला दिलासा देण्यासाठी, आपण कुशल आहोत हा निरोप पाठवण्यासाठी यक्षाने आषाढात आलेल्या पहिल्या मेघाला दूत म्हणून नेमले आहे. आणि यक्ष त्याच्याशी संवाद साधत आहे...इथून ते काव्य सुरू होते. पुढच्या काव्यामध्ये त्या मेघाला सूचना दिल्या आहेत. पूर्व मेघात संपूर्ण सत्य भौगोलिक स्थिती आणि उत्तर मेघात आभासी अलका नगरीचे वर्णन केले आहे, जी अस्तित्वातच नाही. तरीदेखील पूर्व आणि उत्तर मेघाचा एवढा सुंदर मिलाफ केला आहे की ऐकणाऱ्याला आभासी जगाचे वर्णनही खरे वाटू लागते. समृध्द-संपन्न जग उत्तर मेघात दर्शवले आहे. 

'कश्चित कांता विरह गुरूणा...' या एका श्लोकात मेघदूताचे कथाबीज आहे. या कथाबिजावर त्यांनी संपूर्ण काव्य चितारले आहे. पूर्व मेघ हा पूर्ण मेघाचा प्रवास आहे. अलकानगरीपर्यंत...जी काल्पनिक आहे. नागपूर ते कैलास संपूर्ण भौगोलिक प्रवास अत्यंत रंजक पध्दतीने दाखवला आहे. कित्येक वर्णने त्यांनी जिवंत केली आहेत. ती ऐकताना आपल्याला तो पाहिल्याचा भास होतो. 'एरिअल फोटोग्राफी' आहे सगळी. त्यांनी हे कसे अनुभवले असेल? त्यांच्याकडे परिस्थितीचा अंदाज घ्यायला विमानही नव्हते. अभ्यास आणि प्रतिभाचक्षूंच्या आधारावर त्यांनी काव्य रचले आहे. त्यातली भौगोलिक माहिती ताडून पाहिली तर त्यात पूर्ण तथ्य आहे, याचा अर्थ त्यांचा भौगोलिक अभ्यास किती अचूक होता, हेही लक्षात येते.'

धनश्रीताई आपल्या व्याख्यानातून मेघदूताची सफर घडवून आणतात. वेळेअभावी काव्यसंग्रहातील प्रत्येक श्लोकावर बोलणे शक्य नसले, तरी मुख्य मुद्यांवर प्रकाशझोत टाकत, काव्यसौंदर्याचा आस्वाद घेत, काव्यातील बलस्थानांची दखल घेत मेघदूताचे कथानक त्या रसिकांसमोर मांडतात. सद्यस्थितीतील दाखले, समयसूचकतेनुसार मांडलेल्या कविता, व्याख्यानाशी निगडित आठवणी, पूर्वानुवातील काही किस्से, प्रसंग ह्यांची व्याख्यानात अधून-मधून पेरणी केल्यामुळे त्यांचे व्याख्यान अधिकच श्रवणीय होत जाते. 

धनश्री ताई मुंबई विद्यापीठातून पदवीधर होत असताना, पुण्याच्या टिळक विद्यापीठातूनही संस्कृत विषयात पदवीचे शिक्षण घेत होत्या. तेव्हा अभ्यासक्रमात मेघदूताचे १६ श्लोक त्यांना अभ्यासासाठी होते. पाठ्यपुस्तकांत श्लोकांचा अर्थ दिला होता. तरीदेखील श्लोकांचा भावार्थ समजून घेण्यासाठी त्यांनी आपल्या ओळखितल्या `एम.ए. संस्कृत गोल्ड मेडेलिस्ट' असलेल्या श्रीराम जोशी काकांना ते श्लोक शिकवण्याची विनंती केली. त्यांनी सांगितले, शिकायचे तर ११६ श्लोक शिकायचे, फक्त १६ श्लोक नाही. मेघदूत शिकून घेण्याची ही सुवर्ण संधी आहे, असे सांगून धनश्रीताईंच्या बाबांनीही  त्यांना शिकून घेण्याची सक्ती केली. शिकवणी सुरू झाली. काका रोज दोन तास मेघदूत शिकवायचे, ते ही पुस्तक न उघडता. मेघदूताचे रसाळ वर्णन त्यांनी सहज सोपे करून सांगितले. त्यांनी परीक्षेत तो विषय छान मांडला. पुढे संस्कृत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत त्यांनी मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांकही पटकवला. मात्र खुद्द मेघदूताने त्यांची खरी परीक्षा घेतली, ती काही वर्षांनी...

धनश्रीताईंना बालपणापासून वकृत्त्वाची आवड होती. एव्हाना अनेक विषयांवर त्या उत्स्फूर्तपणे व्याख्यान देऊ लागल्या होत्या. निवेदन क्षेत्रातही त्यांनी चांगले नाव कमावले होत़े  अचानक एक दिवस एका संस्थेकडून त्यांना व्याख्यानातून मेघदूत मांडण्यासाठी विचारणा झाली. मेघदूत हे काव्य असून ते गद्यात कसे मांडता येईल, हा त्यांच्यासमोर मुख्य प्रश्न होता. तरीदेखील त्यांनी 'मेघदूता'च्या प्रेमापोटी त्यांनी ते आव्हान स्वीकारले. परंतु, त्याहून मोठे आव्हान तर पुढे होते...

त्या सांगतात, 'ज्या संस्थेने मला व्याख्यानासाठी बोलावले होते, ती संस्था अंध विद्यार्थ्यांसाठी काम करणारी सामाजिक संस्था होती. म्हणजेच, अंध विद्यार्थ्यांना मला मेघदूत उलगडून दाखवायचा होता. ज्यांनी कधी 'काळा मेघ' पाहिला नाही, 'निळे आकाश' पाहिले नाही, अशा मुलांसमोर निसर्गसौंदर्याचे वर्णन कसे मांडावे असा मला प्रश्न पडला होता. ते वर्णन मुलांपर्यंत पोहोचले नाही तर कालिदासांचे काव्य पोहोचण्यात मी अपुरी पडेन, या गोष्टीचे मला दडपण आले. तरी मी पूर्ण तयारीने त्यांच्यासमोर कार्यक्रम केला. कार्यक्रम संपल्यावर मुलांनी माझ्याभोवती गराडा घातला आणि त्यांच्यातल्या एकाने मला हात लावून विचारले, 'कालिदास आमच्यासारखा होता का?' त्याला हा प्रश्न का पडला असावा, हे मी त्याला विचारले असता, तो मुलगा म्हणाला, `तुम्ही वारंवार उल्लेख करत होता, की कालिदासांनी आपल्या प्रतिभाचक्षुंनी हे विश्वसौंदर्य पाहिले. आम्हीसुध्दा जग तसेच पाहतो याचा अर्थ आम्हीसुध्दा हे सौंदर्य अनुभवू शकतो...' हे कालिदासांच्या काव्याचे बलस्थान आहे. 

धनश्री ताईंची मेघदूतावर आजवर बरीच व्याख्याने झाली. संस्कृतातल्या जाणकारांनीदेखील धनश्री ताईंच्या व्याख्यानाचे स्वागत केले आहे. ४० मिनिटांपासून ४ दिवस रोज दोन तास, जशी मागणी असेल त्याप्रमाणे त्यांनी मेघदूत मांडला आहे. दरवेळी काहीतरी नवीन मुद्दे मांडूनसुद्धा या विषयात अजून बरेच काही बोलण्यासारखे बाकी आहे, असे धनश्रीताई अभ्यासपूर्वक सांगतात. तो विषयच एवढा गोड आहे, की सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला त्याचा कंटाळा येत नाही, असेही त्या म्हणतात. कालिदासप्रेमींव्यतिरिक्त इतर लोकही मोठ्या प्रमाणात त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आले आहेत. त्यांच्या श्रोतृवर्गात सर्व वयोगटातील मंडळींचा समावेश असतो. 

धनश्रीताई अपघाताने निवेदनाच्या क्षेत्रात आल्या. बालपणी आजोबांनी पाठांतराची सवय लावल्याने, आईने कथाकथनाची गोडी लावल्याने, रुईया महाविद्यालयात त्यांच्या वत्कृत्त्वशैलीला खतपाणी घातले गेल्याने त्यांच्यातला अभ्यासू कलाकार घडत गेला. शाळेत आणि महाविद्यालयात संस्कृत भाषेच्या अध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर एकाएक त्यांच्या आवाजावर ताण पडू लागला. त्यांनी नोकरीस राजीनामा देऊन आवाज पूर्ववत आणण्यासाठी अनेक खस्ता खाल्या. एकदा एका आवाजाच्या कार्यशाळेत विद्यार्थी म्हणून गेल्या असता त्यांना निवेदन करण्याची संधी मिळाली आणि एक नवे क्षेत्र त्यांच्यासाठी खुले झाले. 

'मेघदूत' हा धनश्री ताईंचा  अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या सांगतात, 'कालिदासांनी मेघदूताचे मुक्त काव्य मांडले आहे, तर त्याचे वर्णनही चौकटीत राहून न करता मुक्तपणे केले पाहिजे.' अशीच विचारांची आणि विषयांची चौकट मोडून काढत धनश्री ताईंनी आजवर अनेक विविध विषयांवर संहिता तयार केल्या आहेत. आषाढाच्या पहिल्या दिवसानिमित्त आज आपण मेघदूताची तोंड ओळख करून घेतली. कधी त्यांच्या व्याख्यानाचा प्रत्यक्ष लाभ घेता आला तर संधी दवडू नका!