Jagannath Rath Yatra 2024: भारतात संस्कृती आणि परंपरांना मोठे महत्त्व दिले जाते. देशभरातील हजारो मंदिरांमध्ये सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. भारतातील काही मंदिरांचा प्रभाव जगभरात असल्याचे दिसून येते. भारतातील अनेक मंदिरे जगातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी आहेत. दरवर्षी कोट्यवधी भाविक, पर्यटक या मंदिरांना भेटी देत असतात. ओडिशातील पुरी येथे असलेले जगन्नाथ मंदिर त्यापैकीच एक आहे. जन्ननाथ मंदिराची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. येथील रथयात्रा जगप्रसिद्ध असून, देश-विदेशातून लाखो पर्यटक या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी येत असतात.
बहुतांशी मंदिरांची परंपरा, जत्रा, उत्सव मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरे केले जातात. त्यातीलच एक म्हणजे जगन्नाथ पुरीचे मंदिर. या मंदिराशी, रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये, रहस्ये जितकी अद्भूत आहेत, तितकीच ती अचंबित करणारी आहेत. जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीयेपासून सुरू होते. या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते. भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगर भ्रमण करतात. या यात्रेत प्रतिवर्षी सुमारे किमान ८ लाख भाविक सहभागी होत असतात. यंदा ०७ जुलै रोजी रथयात्रा सुरू होणार असून, १६ जुलैपर्यंत रथयात्रा सुरू राहणार आहे.
५३ वर्षांनी अद्भूत शुभ योगात रथयात्रा
यंदाच्या वर्षी जगन्नाथ रथयात्रा पूर्ण दोन दिवस चालणार असल्याचे सांगितले जात आहे. तब्बल ५३ वर्षांनी असा योग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. रथयात्राच्या परंपरा ०७ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. यावर्षी सायंकाळी रथयात्रेला सुरुवात होऊ शकते, अशी माहिती देण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी रथ पुढे जात नाहीत. त्यामुळे ८ जुलै रोजी सकाळी पुन्हा रथयात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर हे रथ गुंडिचा मंदिरात पोहोचेल.
भगवान जगन्नाथ विष्णूंचे अवतार
हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचे सांगितले जाते. एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर सुमारे १४४ वर्षे बंद होते. जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. भगवान जगन्नाथांच्या मूर्तींना प्रत्येक १२ वर्षांनंतर नवलेपन केले जाते. प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात. नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही.
जगन्नाथ रथयात्रेतील तीन रथांची वैशिष्ट्ये अन् महात्म्य
जगन्नाथ रथयात्रेत श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचे रथ असतात. या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वांत पुढे असतो. याला तालध्वज, असे म्हटले जाते. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो, याला दर्पदलन किंवा पद्मा रथ, असे संबोधले जाते. सर्वांत शेवटी भगवान श्रीकृष्णांचा रथ असतो. याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज, असे म्हटले जाते. दोन्ही भावांची लाडकी बहीण सुभद्रा दोन भावांची संरक्षणात यात्रा करते, अशी मान्यता आहे. या रथांपैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बलरामांचा रथ ४५ फूट उंच असतो. तर, सुभद्राच्या रथाची उंची ४३ फूट असते, असे सांगितले जाते.