श्रीकृष्णाचे जीवनचरित्र अद्भुत व रोमांचकारी असून तो विष्णूचा आठवा अवतार आहे. त्याचे स्मरण म्हणून भारतात सर्व ठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी कृष्णाचा जन्मदिन झाल्यावर त्याचे पूजन तसेच कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दुसऱ्या दिवशी दहीहंडी, गोपाळकाला व पारण्याचा आनंद भक्त लुटतात.
भारतीय संस्कृतीत सर्व देवादिकांमध्ये श्रीकृष्णाला मानाचे व आदराचे स्थान असून कृष्ण नीती ही भारताला दिलेली अमूल्य ठेव आहे. माणसाने त्याप्रमाणे वागल्यास त्याचे आयुष्य सुखी होते यात शंका नाही.
भगवान विष्णूने धर्माचे रक्षण करण्याकरीता ज्या दिवशी श्रीकृष्णस्वरूपात अवतार घेतला तो दिवस म्हणजेच गोकुळाष्टमी! श्रीकृष्णाचा मामा कंस, त्याने प्रजेला खूप छळले होते. कृष्णाने त्याचा वध करून आपल्या आई वडिलांना बंदिवासातून मुक्त केले. पुढे याच श्रीकृष्णाने जरासंध, शिशुपाल या राक्षसांना पण ठार केले. कौरव, पांडव युद्धात कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे आपल्याला वरचेवर स्मरण व्हावे म्हणून सर्व ठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्सव उत्साहाने साजरा करतात.
ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो, ते लोक उपास करातात. रात्री बारा वाजून चाळीस मिनीटांनी कृष्णाचा जयघोष करून जन्म साजरा करतात व दुसऱ्या दिवशी पारणे करतात.
Janmashtami 2021 : गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवू नयेत? या प्रथेमागची कथा!
या उत्सवाचा धार्मिक विधी पुढीलप्रमाणे :
श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी उपवास करून रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव करावा. श्रीकृष्णाचे देवायल नसल्यास श्रीनारायणाचे देवालयात जन्मोत्सव करतात. मोठमोठ्या शहरात अन्य मंदिरातही जन्मोत्सव केला जातो. रात्री कीर्तन, मंत्रश्रवण, भजन, पुराण वगैरे यथासंभव कार्यक्रम करतात. बालगोपाल मित्रमंडळी नाचत नाचत वाद्य वाजवीत 'गोविंदा आला रे आला' किंवा नुसते `गोविंदा रे गोपाळा' असे म्हणत कृष्णदर्शन घेऊन मग आपापल्या घरी जातात.
श्रावण वद्य नवमीला 'दहीकाला' असे म्हणण्याची प्रथा आहे. या दिवशी पुष्कळ गावातून, खेड्यापाड्यातून घरोघरी बालगोपाळ मंडळी नाचत असतात. नाचत असताना त्यांच्या अंगावर ताक, दही कढत पाणी व थंड पाणी ओतण्याची पद्धत आहे. काही हौशी लोक आपले घरी हंडी बांधतात व ती बालगोपालांकरवी फोडतात. सर्व गावात नाचून झाल्यावर कृष्णमंदिरात जाऊन तेथील हंडी फोडतात. त्या वेळी काही ठिकाणी भुईमुगाच्या शेंगा उडवण्याची प्रथा असते. चुरमुरे, फुटाणे, लाह्या, मीठ, मिरची, साखर इ. जिन्नस घालून काला केला जातो व तो सर्वांना वाटला जातो.
मथुरा, गोकुळ, वृंदावन या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. बाहेरगावचे अनेक जण हा उत्सव पाहण्यासाठी मुद्दाम हजेरी लावतात.