श्रावण वद्य अष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस तसेच संत ज्ञानेश्वरांचाही जन्मदिवस! भगवान गोपाळकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून अखिल विश्वाला गीतामृत पाजले तर संत ज्ञानेश्वरांनी तेच गीतामृत सर्वसामान्य जनाला विविध दृष्टांत देत प्राकृत मराठी भाषेत ओवीबद्ध करून ज्ञानेश्वरी स्वरूपात मांडले. एवढेच नाही तर ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणासाठी विश्वात्मक देवाकडे 'पसायदान' मागितले.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ९००० ओव्यांचा वाक् यज्ञ केल्यावर, त्याची सांगता करत असताना ९ ओव्यांमध्ये भगवंताकडे मागणे मागितले. स्वत:साठी का? नाही...तर विश्वासाठी! हेच संतलक्षण आहे. आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, साधू-संतांनी जेव्हा जेव्हा भगवंताकडे याचना केली, त्यात कधी स्वार्थ नव्हताच, तर केवळ 'समष्टी'साठी प्रार्थना होती.
पसायदानातही माऊली विश्वात्मक देवाला आर्जव करते, माझ्याकडून जो वाक् यज्ञ करवून घेतलास, त्यात सारे काही सांगून झाले आहे आणि आता मागायची वेळ आली आहे. हे मागणे माझ्या एकट्यासाठी नसून अखिल विश्वासाठी आहे, ते तू पूर्ण कर. तोषावे म्हणजे तृप्त हो आणि तृप्त होऊन मी जे सर्वांसाठी मागतोय, ते पसाय म्हणजे प्रसादरूपी दान आमच्या पदरात घाल.
माउलींच्या शब्दात एवढी ताकद होती, की त्यांनी जे खळांची व्यंकटी सांडो ऐवजी जे खळांची पिढी नष्ट होवो, म्हटले असते तरी देवाने ऐकले असते. एवढा त्यांचा अधिकार होता. पण माउलींचा लोकांच्या चांगुलपणावर विश्वास आहे. ते म्हणतात वाईट वृत्ती कमी अधिक प्रमाणात सगळ्यांमध्ये असते. म्हणून व्यती वाईट ठरत नाही. म्हणून जी व्यंकटी अर्थात दुष्ट वृत्ती आहे ती नष्ट होउदे, म्हणजे रामराज्य अवतरेल.
एकदा का वाईट वृत्ती नष्ट झाली, तर उरतील फक्त चांगले लोक. जे समष्टीचा विचार करतील, ज्यांच्या ठायी भूतदया असेल, परस्पर प्रेम असेल, सद्भावना असेल, ते केवळ चांगल्या कार्यासाठीच प्रवृत्त होतील, त्यांच्या हातून चांगलीच कामे घडतील आणि या सर्वांच्या प्रयत्नामुळे हे विश्व अतिशय सुंदर होईल. कारण येथील प्रत्येक जीवाला, दुसऱ्या जीवाप्रती सहानुभूती असेल.अशा लोकांना 'जो जे वांछिल तो ते लाहो' म्हणजेच ते जे मागतील ते त्यांना दे, कारण त्यात दुसऱ्यांबद्दल द्वेष भाव नसेल. तर प्रत्येकजण स्वतः बरोबर इतरांच्या उत्कर्षाचा विचार करेल.
अशी स्थिती निर्माण झाल्यावर इथले वृक्ष कल्पतरू होतील आणि इथली रत्ने चिंतामणी होऊन इच्छापूर्ती होतील. सुखा समाधानाने, गुण्या गोविंदाने सगळे नांदतील. दुःख, वैर, द्वेष, मत्सर लयाला गेल्यामुळे निःशंकपणे लोकांचे मन ईश्वर चिंतनात रममाण होईल. तो दिवस नक्की येईल, अशी माउलींना खात्री वाटते. ते ज्यादिवशी घडेल त्या दिवशी हा ज्ञानदेव 'सुखिया झाला' असे समजावे!