यंदा १८ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी आहे. या तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा जन्मोत्सव जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गोपाळकृष्णाची पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो, कथा कीर्तन केले जाते, त्याबरोबरच हरिवंश पुराण वाचण्याचाही प्रघात आहे. या पुराणात काय आहे ते जाणून घेऊ.
हरिवंश पुराणात भगवान गोपालकृष्णाच्या अनेकविध लीलांचे वर्णन असून यातील अनेक लीला कथा भागवत, नारदपुराण, पद्मपुराण इत्यादीमध्ये थोड्याफार फरकाने आल्या आहेत. भगवान विष्णूंनी पृथ्वीचा भूभार हलका करण्यासाठी यादवकुळात वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्णरूपाने अवतार घेतला इथपासून या ग्रंथाचा प्रारंभ होतो.
यानंतर श्रीकृष्णाच्या गोकुळातील बालपणीच्या खोड्या, पूतना, तृणावर्त, धेनुकासुर, प्रलंब, अरिष्टासुर इत्या दैत्यांचा केलेला वध, गोकुळातील त्याची गोरस चोरी, यशोदेला घडवलेले विश्वदर्शन, इंद्रगर्वहरण, गोवर्धनोद्धार, कंस वध, जरासंधाशी युद्ध, कालयवनाचा वध इ. अनेक अद्भूतकथा आल्या आहेत.
कृष्ण मोठा झाल्यावर द्वारकानिर्मिती, रुक्मिणीहरण, स्यमंतकमणिप्रकरण, त्याचे अनेक विवाह, सोळासहस्त्र गोपींची सुटका व त्यांच्याशी कृष्णाचा विवाह, कृष्णाच्या अष्टनायिका, त्याने केलेली युद्धे, शेवटी यादव कुळाचा संहार, उद्धवास उपदेश व शेवटी प्रभासक्षेत्री स्वात्म विसर्जन, अवतार समाप्ती इ. कथा आल्या आहेत.
ग्रंथाच्या शेवटी हरिवंश पुराणाचे महात्म्य व फलश्रुती सांगितली असून या पुराणाचे पारायण कसे करावे, किती टप्प्यात करावे याचीही माहिती दिलेली आहे. हे हरिवंशपुराण ब्रह्मा-विष्णु-महेश स्वरूप असून याच्या श्रवण पठणाने सर्व पातकांचा नाश होतो व मनुष्याच्या सर्व पवित्र इच्छा पूर्ण होतात. सर्व संकटांचा परिहार होतो. सर्वांचे इह पर कल्याण होते व शेवटी मोक्षप्राप्ती होते असे फलश्रुतीत म्हटले आहे.
श्रीकृष्ण हा आपला आयुष्यभराचा सोबती आहे. आकाशातला चंद्र जसा आपण चालताना आपल्याबरोबर चालतो असे वाटते, तसा गोपालकृष्ण सदैव आपल्या बरोबर चालत असतो. मग त्याचा विस्तृत परिचय नको का करून घ्यायला? गोपालकृष्णाशी समरस व्हायचे असेल, तर हरिवंशपुराण एकदा तरी मन लावून नक्की वाचा. त्याची अनेक भाषांमध्ये भाषांतरे उपलब्ध आहेत आणि इंटरनेटवर ती पीडीएफ स्वरूपातही सहज मिळू शकतील. कृष्ण जन्माच्या निमित्ताने आपणही मनाशी चंग बांधला, तर हरिवंशपुराण आपले सहज वाचून होईल!