अंधःकारात प्रकाशाची वाट दाखवणारा, दैत्यांचा कर्दनकाळ ठरणारा, आपल्या बासुरीने सर्वांना मोहून टाकणारा आणि जगाला तत्वाज्ञाचे ज्ञानामृत पाजणारा भगवान श्रीकृष्ण याचा जन्मसोहळा अर्थात जन्माष्टमीचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. यंदाही ६ सप्टेंबर रोजी हा उत्सव 'गोविंदा रे गोपाळा' या गजरात पार पडणार आहे.
श्रावण वद्य अष्टमीला पूर्वरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. ही वेळ रात्री १२ वाजता गृहीत धरली जाते. त्या मुहूर्तावर कृष्णाचा जयघोष करून जन्म झाला असे कथा कीर्तनातून घोषित केले जाते. फटाके फोडून, वाद्य वादन, टाळ-नामाचा गजर करून कृष्ण जन्म (Janmashtami 2023) झाल्याची वर्दी दिली जाते. यंदा ८ सप्टेंबर २०२३ रोजी बुधवारी रात्री हा उत्सव साजरा केला जाईल.
कृष्णाने संघटन शक्तीवर भर दिला होता. त्यामुळे हा उत्सव शक्यतो एकत्र येऊन साजरा करावा. अगदीच शक्य नसेल तर पुढे दिल्यानुसार घरच्या घरी विधिवत पूजा करावी. त्यासाठी जन्म मुहूर्ताचा काळ, पूजा विधी आणि पाळणा याबद्दल माहिती घेऊ.
देवघरातल्या बाळकृष्णाला छोटासा पाळणा करून त्यात बाळकृष्णाला जन्माच्या मुहूर्तावर पाळण्यात जोजवले जाते. नवीन वस्त्र परिधान केली जातात. हार घातला जातो. लोणी किंवा दही साखरेची वाटी देवासमोर ठेवली जाते. गुलाल, फुलं उधळून कृष्णाचा जयघोष केला जातो. केळं, पेढे, पंजिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक भाविक या दिवशी उपास करतात व दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा प्रसाद ग्रहण करून उपास सोडतात.
कृष्णजन्माचा मुहूर्त :
श्रावण वद्य अष्टमी प्रारंभ: ०६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०३ वाजून ३७ मिनिटे.
श्रावण वद्य अष्टमी सांगता: ०७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०१ वाजून १६ मिनिटे.
श्रीकृष्ण जन्मोत्सव: ०६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्रौ १२ वाजता. (जयंती योग)
रोहिणी नक्षत्र प्रारंभ: ०६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ वाजून १९ मिनिटे.
रोहिणी नक्षत्र समाप्ती: ०७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजून २४ मिनिटे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीला अद्भूत योग
यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला अनेक अद्भूत योग तयार होत आहेत. ०६ सप्टेंबर रोजी दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योगात चंद्र वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात असताना एक विशेष योग जुळून येत आहे. तसेच ०६ सप्टेंबर रोजी श्रावण कृष्ण पक्ष, मध्यरात्री अष्टमी तिथी आहे. जेव्हा जन्माष्टमी बुधवार किंवा सोमवारी येते तेव्हा ती खूप शुभ मानली जाते. यावेळी ०६ सप्टेंबर रोजी एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. जेव्हा असा योग जुळून येतो, तेव्हा त्याला जयंती योग म्हटले जाते.
कृष्ण जन्माचा पाळणा :
बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ।निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥
जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी ।पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥
बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी ।जनकशृंखला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥२॥
मार्गी नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा ।शेष धावला तत्क्षणा । उंचावूणी फणा ॥३॥
रत्नजडित पालख । झळके आमोलिक ।वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥४॥
हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥५॥
विश्वव्यापका यदुराया । निद्रा करी बा सखया ।तुजवरि कुरवंडी करुनिया । सांडिन मी निज काया ॥६॥
गर्ग येऊनी सत्वर । सांगे जन्मांतर ।कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥७॥
विश्वव्यापी हा बालक । दृष्ट दैत्यांतक ।प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥८॥
विष पाजाया पूतना । येता घेईल प्राणा ।शकटासुरासी उताणा । पाडिल लाथे जाणा ॥९॥
उखळाला बांधता मातेने । रांगता श्रीकृष्ण ।यमलार्जुनांचे उद्धरण । दावानव प्राशन ॥१०॥
गोधन राखिता अवलिळा । कालिया मर्दीला ।दावानल वन्ही प्राशील । दैत्यध्वंस करी ॥११॥
इंद्र कोपता धांवून । उपटील गोवर्धन ।गाईगोपाळा रक्षून । करीन भोजन ॥१२॥
कालींदीतीरी जगदीश । व्रजवनितांशी रास ।खेळुनि मारील कंसास । मुष्टिक चाणुरास ॥१३॥
ऎशी चरित्रे अपार । दावील भूमीवर ।पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥१४॥