श्रीकृष्णाच्या प्रत्येक कृतीतून बोध घेण्यासारखा आहे. धर्म नीतीसाठी आयुष्यभर झगडूनही तो सरळ सरळ मान्य करतो, 'माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा!' याचाच अर्थ त्याने आपले मोठेपण कधी बिंबवले नाही, तर त्याच्या कर्तुतत्वातून ते उलगडत गेले, अगदी जन्मापासून! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्याचे जन्मरहस्य काय होते, ते जाणून घेऊया!
कंस भगिनी देवकी आणि वसुदेव यांच्या लग्नप्रसंगी वरातीचे वेळी त्या उभयतांच्या रथाचे सारथ्य प्रत्यक्ष कंस करत होता. त्यावेळेस आकाशवाणी झाली, की देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल. ही आकाशवाणी ऐकताच संतप्त होऊन कंसाने देवकी वसुदेवाला बंदिवासात टाकले. पुढची कथा आपल्याला माहीत आहेच. यथावकाश श्रीकृष्ण जन्म झाला. कृष्णाच्या सांगण्यावरून वसुदेवाने श्रीकृष्णाला गोकुळात नेण्याचे ठरवले.
श्रीकृष्णाच्या योगमायेने बंदिवासाचे दार आपोआप उघडले. श्रीकृष्णाला टोपलीत ठेवण्यात आले. यमुना नदी पार करून जायचे होते. यमुना नदीला पूर आला होता. त्या नदीला कृष्णाच्या चरणांचे दर्शन घ्यायचे होते. वसुदेवाने श्रीकृष्णाला यशोदा नंदराजाकडे सुखरूप नेऊन सोडले. त्यांची कन्या प्रत्यक्ष माया घेऊन वसुदेव तिथून बंदिवासात आले. तोच देवकीचा आठवा पुत्र आहे असे समजून कंस त्या बाळाला मारायला धावला. त्याच्या हातून ती माया निसटली आणि म्हणाली तुझा काळ जन्माला आला आहे. सावध हो...!
अशी ही कृष्णकथा! तुम्ही म्हणाल, ही तर आम्हालाही माहीत आहे, मग यात नेमके रहस्य काय? तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कृष्णाने आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला. अगदी आपल्या जन्म कथेतूनही. कृष्णाच्या जन्मकथेतून माणसाच्या जन्माच रहस्य देखील आपोआप उलगडत जातं. ते रहस्य असे - मातेच्या उदर बंदिवासातून आपण बाहेर पडतो. आईशी नाळ तुटते. जन्माला एकटे आलो, जाणारही एकटेच! सर्व नाती लौकिकातील नाती आहेत. त्या नात्यांना कर्तव्य दशे पुरतेच मर्यादित ठेवले पाहिजे. प्रेमपाशात अडकून न राहता जो कर्तव्याला जागतो त्याचेच भले होते. नाती आज ना उद्या सुटणार आहेतच. म्हणून ती मुद्दामून तोडायची असे नाही. तर त्या नात्यांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडून आपल्या जीवनाचे उद्दिष्ट गाठले पाहिजे. वसुदेव देवकीला कृष्णाचे जन्मदात्रे म्हणून मान मिळाला, परंतु पुत्रासहवास नंद यशोदेला मिळाला. कृष्णाने त्यांना हे सौभाग्य दिले परंतु तो धर्मकार्यार्थ जन्माला आला होता. ते अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी ना तो माता पित्यांजवळ थांबला ना गोप गोपिकांमध्ये फार काळ रमला. तो कर्तव्याला जागला म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयात कृष्ण कायमस्वरूपी घर करून राहिला! आहे की नाही हे सुंदर रहस्य, आपल्या आणि कृष्णाच्या जन्माचे?
गोपालकृष्ण भगवान की जय!