आपल्या देवतघरात अन्नपूर्णा माता, शिवलिंग, दत्त गुरु, गणपती आणि बाळकृष्ण या देवता असतातच. याशिवाय आपण ज्यांची उपासना करतो ते देवही असतात. शास्त्रानुसार या देवतांच्या पूजेइतकीच बाळकृष्णाची पूजा महत्त्वाची आहे. त्यासाठी वेगळे उपचार करायची गरज नाही, फक्त आपल्याला काही आवश्यक बदल करावे लागतील. २६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी (Janmashtami 2024) आहे, त्यानिमित्त हे बदल जाणून घेऊ.
भगवान श्रीकृष्ण ज्यांनी आपला परममित्र सुदामा याला त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन न मागता सगळे काही दिले. तर आपणही श्रीकृष्णाची मनोभावे उपासना केली असता आपल्यालाही भौतिक, पारमार्थिक सुखं मिळतील असा दिलासा ज्योतिषशास्त्राने दिला आहे. ती पूजा कशी असायला हवी ते पाहू.
बहुतेक सर्व घरांमध्ये भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप असलेली प्रतिमा किंवा मूर्ती असते. या मूर्तीची विधीवत पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक धारणा आहे. असे मानले जाते की लाडू गोपाळाची योग्य प्रकारे पूजा केल्याने शुभ फळ मिळते आणि सौभाग्य वाढते.
अशी आंघोळ घाला :
सकाळी स्नान करून मंदिर स्वच्छ करावे. बाळकृष्णाच्या मूर्तीला रोज पाण्याने स्नान घालावे. फक्त पाण्यात तुळशीची चार पाच पाने टाकावीत. कारण कृष्णाला तुळस प्रिय आहे. शक्य असल्यास पंचामृताने स्नान घालावे. दूध, दही, मध, गंगाजल आणि तूप यांच्या मदतीने पंचामृत बनवावे.
बाळलेणी घाला :
श्रीकृष्णाचे बालरूप कोणाही मनाला सहज भावते. कृष्णाष्टमीला आपण त्या मूर्तीला जसे सजवतो, तसे एरव्ही सुद्धा शक्य आल्यास बाळलेणी घालावीत. बाळाला मुकुट, दागिने, बासरी द्यावी. तसे केल्याने कृष्ण कृपा होण्यास मदत होते.
श्रीकृष्णाच्या नावे दान :
बाळकृष्णाच्या कृपेने आपल्या घरात सुबत्ता यावी हे जसे आपल्याला वाटते, तसेच आपणही दुसऱ्यांच्या संसाराला हातभार लावावा. यथाशक्ती दानधर्म करावा. लहान मुलांना बोलावून खाऊ द्यावा. एखादी लेकुरवाळी स्त्री घरी आली असता तिची खणानारळाने ओटी भरून तिच्या बाळाला खाऊ किंवा शक्य तेवढे पैसे द्यावे, खेळणं द्यावे, गरीब मुलांना शालेय उपयोगी वस्तू द्याव्यात.
थोडक्यात आत्मा ते परमात्मा हा प्रवास पार करण्यासाठी आधी दुसऱ्यांच्या आनंदाला हातभार लावावा, जेणेकरून भगवंत आपल्या सुखाची काळजी घेतो. घरातील सुख, समृद्धीसाठी दिलेले उपाय अवश्य करा.