प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोषकालयुक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात. प्रदोषकाल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो. प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या तेरा तत्त्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे. किंबहुना या तेरा तत्त्वातील संचित मायामल निरस्त होण्यासाठी प्रदोषव्रताची योजना आहे.
प्रदोष व्रताचा विधी:
प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा. प्रदोषव्रतादिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारणा (उपासानंतरचे भोजन) असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णूपूजन केले जाते. या व्रतासाठी आदिमायेसह साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते. प्रदोषव्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा. मुख्य व्रतादिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन करावा. तो प्रकृतीस मानवत नसेल, तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा.
प्रदोषव्रताचा अधिकार :
प्रदोषव्रताचा अधिकार सर्व जातिधर्माच्या व सर्व वयोगटाच्या स्त्रीपुरुषांना आहे. विशेषत: संबंधात अडथळे आलेल्या, संतती कुमार्गास लागलेल्या, कर्जाने पीडित झालेल्या, सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोषव्रत करावे. जितके काटेकोर, विधीपूर्वक, श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे व्रत केले जाते, तितके त्याचे अधिकाधिक फळ मिळते.
१५ जानेवारी रोजी शनी प्रदोष व्रत आहे. हे दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि त्रयोदशीला येते. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी प्रदोष व्रत शनिवारी येत आहे. म्हणून याला शनी प्रदोष व्रत म्हटले जाईल. या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवन समृद्ध होते. केवळ फळे, फुले, धूप-दीप इत्यादींनी पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात, असे शास्त्रात सांगितले आहे.
प्रदोषाच्या वेळेस भगवान शंकराची पूजा करा असे शास्त्राचे सांगणे असले तरी या पूजेने शनी देवदेखील प्रसन्न होतात. असा हा शनी प्रदोषाचा मुहूर्त चुकवू नका आणि शनी देवाची तसेच महादेवाची कृपादृष्टी प्राप्त करा.