Jaya Parvati Vrat 2024: देवशयनी आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. चातुर्मास काळात सृष्टीचे पालन-चालन महादेव करतात, अशी मान्यता आहे. चातुर्मास काळाला भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशीनंतर साजरे केले जाणारे एक व्रत म्हणजे जया पार्वती व्रत. देशातील अनेक ठिकाणी हे व्रत केले जाते. हे व्रत सुमारे सहा दिवसांचे असते, असे सांगितले जाते. कसे करावे हे व्रत, मान्यता आणि महात्म्य काय आहे, ते जाणून घेऊया...
आषाढ शुद्ध त्रयोदशीपासून जया पार्वती व्रतांरभ होतो आणि आषाढ कृष्ण तृतीयेला या व्रताची सांगता केली जाते. म्हणजेच यंदाच्या वर्षी १९ जुलै २०२४ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत हे व्रत केले जाणार आहे. अविवाहित आणि सौभाग्यवती महिला या व्रताचे आचरण करतात. अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे, यासाठी हे व्रत प्रामुख्याने केले जाते. तर चांगला जोडीदार मिळावा, यासाठी अविवाहिता या व्रताचे आचरण करतात, असे म्हटले जाते.
जया पार्वती व्रताचा पूजन विधी
हे व्रत देवी जया यांना समर्पित असल्याचे सांगितले जाते. जया या पार्वती देवीचे प्रतिरुप असल्याची मान्यता आहे. जया पार्वती व्रताचरण करणाऱ्यांनी सकाळी लवकर नित्यकर्म आटोपल्यानंतर शिव-पार्वती पूजनाचा संकल्प करावा. शिव-पार्वतींचे आवाहन करून त्यांची स्थापना करावी. शिव-पार्वतीच्या प्रतिमेवर किंवा मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक करावा. त्याच पंचामृताचा नंतर नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षता, ऋतुकालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. पार्वती देवीचे नामस्मरण, मंत्रजप करावे. जय पार्वती व्रताची कथेचे वाचन करावे किंवा कथा ऐकावी.
जया पार्वती व्रत पूजनाचे महात्म्य
आपल्याला उत्तम जोडीदार मिळावा किंवा अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, म्हणून हे व्रत प्रामुख्याने आचरले जाते. या व्रताचा संकल्प केल्यानंतर पाच, सात, नऊ, अकरा आणि २० वर्षे हे व्रत करावे, असे सांगितले जाते. खुद्द भगवान श्रीविष्णूंनी लक्ष्मी देवीला या व्रताचे महत्त्व सांगितले होते, अशी मान्यता आहे. काही ठिकाणी एका दिवसाचे तर काही ठिकाणी पाच दिवसाचे व्रत करण्याची परंपरा आहे. या व्रतामध्ये मातीचा गज (हत्ती) तयार करून त्याचेही पूजन केले जाते. व्रताची सांगता झाल्यानंतर या मातीच्या गजाचे विसर्जन केले जाते. या व्रतादिनी रात्री जागरण करून भजन-कीर्तन केले जाते. व्रत आचरल्यानंतर सात्विक आहार घेण्याचे सल्ला दिला जातो. व्रताची सांगता करताना पूजन केल्यानंतर उपवास सोडावा, असे सांगितले जाते.