मुंबई - कोरोनाविरुद्ध गेल्या २ महिन्यांपासून भारतीयांची लढाई सुरु असून १ महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांसाठी काही वेळेची सवलत नागरिकांना देण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशातील प्रत्येक नागरिक आपलं योगदान दे आहे. मात्र, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी आणि पोलीस प्रशासना रात्रंदिवस राबताना दिसत आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक ताण पोलीस यंत्रणा आणि वैद्यकीय क्षेत्रावर पडला आहे. तरीही, ते ऑन ड्युटी २४ तास सेवा देत आहेत. या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून सत्यपाल महाराजांचे किर्तन आयोजित केले आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवा देऊन कर्तव्य बजावणाऱ्या वैद्यकीय, पोलीस, सफाई कामगार, ड्रायव्हर, शेतकरी यांचे आभार मानून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानस लोकमत भक्ती युट्यूब चॅनेलचा आहे. विशेष म्हणजे, सत्यपाल महाराज यांच्या किर्तनाच्या माध्यमातून ही कृतज्ञता व्यक्त होत आहे. सोमवार सकाळी ९ वाजता लोकमतच्या भक्ती या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून सत्यपाल महाराजांचे किर्तन आयोजित केले आहे.
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुलेतोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणवा
अभंगातील या ओवींप्रमाणे आज समाजात रंजल्या-गांजल्या लोकांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. गरिबांना, मजूरांना दोन वेळचं जेवण पुरविण्याचं काम, या भुकेल्यांची भूक भागविण्याचं काम या दानशूर हातांकडून होत आहे. त्यामुळे, हे दानशूर व्यक्तीच साधू, हेच देव असे म्हटलं तर वावगं ठरणार आहे. या समाजसेवक, दानशूर व्यक्तींबद्दलही किर्तनातून कृतज्ञता व्यक्त होणार आहे. त्यामुळे सर्वच प्रेक्षकांनी, वाचकांनी सकाळी ९ वाजता या किर्तनात, भक्तीमय वातावरणात तल्लीन व्हावे.