विजयराज बोधनकरशुभशकुन आणि अपशकुन या दोन पायवाटेवरून चालतांना कित्येक वर्षांपासून मानवी मनात भांडणतंटे निर्माण झालेले आजही पहायला मिळतात. जर कोऱ्या कागदावर टोकाचे नकारात्मक लिहिले तर तो कागदच अपशकुनी आणि दुर्दैवी ठरवला जातो आणि तेच सकारात्मक लिहिले की तोच कागद शुभशकुनी आणि सकारात्मक ठरत जातो. हा लिहिणाऱ्याचा दोष की कागदाचा? आपल्या मनाचे कागद आपण कसे लिहून ठेवले आहेत हे प्रत्येकाने तपासून पाहणे गरजेचे आहे.
पूर्वी मांजर आडवे गेले की लोक घरी परत जायचे आणि आता नव्या काळाने मांजरीला डोक्यातून हद्दपार केल्यामुळे मूळ अज्ञानाचाच पराजय माणसानेच केला आहे, पण मांजरीसारख्या हजारो पोकळ गोष्टी आजही जुनाट विचारसरणीतून नव्या मुक्तीच्या मार्गावर येतांना दिसत नाही. ग्रामीण भागात या अपशकुनाची मुळं आजही घट्ट रूतून असल्याने आर्थिक आणि वैचारिक गरीबीचा घेराव कमी झालेला नाही. नव्या पिढीने यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.डोक्यातला भ्रम संपला की कामाचा योग्य क्रम सुरू होतो. जिथे या शकुन, अपशकुनाचे खेळ थांबलेले दिसते तिथे शांती आणि क्रांतीची सकाळ होताना दिसते. नवा भारत, नवी पिढी सक्षम होण्यात अडचण असेल तर ती अपशकुनाच्या ओझ्याची. देव, धर्म, जात, पंथ, उत्सव, पारायणं, व्रत याचे नवे अर्थ काढणारी मंडळी जोपर्यंत ताकदीने उभी होत नाहीत तोपर्यंत स्वयंप्रेरीत माणसं, समाज घडवणं कसं शक्य आहे? अठराव्या शतकाच्या अगोदरच्या काळापासून तर धागेदोरे, मंत्रतंत्र, गावठी भगताचा पगडा, देवापुढे बळी, सती प्रथा, मानवी श्रेष्ठत्वांचे स्तोम अशा माऱ्यात समाज पिचला होता. त्यातून बराचसा समाज बाहेर पडला असला तरी त्याचा मोठा अंश आजही शिल्लक आहे. त्याचा नायनाट करणे नव्या पिढीच्या हाती आहे. झाडाला मारण्याचे इंजेक्शन दिले तर झाड मरते, अन्यथा त्याचा वटवृक्ष होऊ शकतो.