अलीकडच्या काळात पंचांग बघण्याचा आपला सराव मोडलेला आहे. भिंतीवरील नाहीतर मोबाईल ऍपवरील दिनदर्शिका हेच आपले प्रमाण असते. परंतु जेव्हा एखादी तिथी दोन दिवसात विभागून येते, तेव्हा आपला गोंधळ होतो. तसेच काहीसे झाले आहे ज्येष्ठ अमावस्येच्या बाबतीत. दिनदर्शिकेवर २८ आणि २९ जून ज्येष्ठ अमावस्या दाखवत आहेत, मग नेमकी अमावस्येची तिथी कोणती धरायची? असा तुमचा संभ्रम झाला असेल तर पुढील माहिती वाचा.
पाश्चात्य संस्कृतीनुसार त्यांचा दिवस रात्री १२ वाजता सुरू होतो तर हिंदू संस्कृतीनुसार तो सूर्योदयापासून सुरू होतो. म्हणून हिंदू पंचांगानुसार जी तिथी ज्या दिवशीचा सूर्योदय पाहते, ती त्या दिवसाची तिथी असते. मात्र अमावस्या-पौर्णिमा या तिथी सूर्याशी नाही तर चंद्राशी संबंधित असल्यामुळे ती चंद्रोदयाच्या वेळेवर अवलंबून असते. मात्र ज्येष्ठ अमावस्येची तिथी पाहिल्यास ती वेळ सूर्योदयाच्या आधी आल्यामुळे ज्येष्ठ अमावस्या २८ जून रोजी पहाटे ५.५१ वाजता सुरू होत असून ती २९ जून रोजी सकाळी ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत असेल. याचाच अर्थ अमावस्यां तिथी आणि त्यासंबंधित नियम २८ जून रोजी पाळणे बंधनकारक ठरेल. २८ तारखेला अमावस्या अहोरात्र आहे आणि २९ ला सकाळीदेखील सूर्योदयाची तिथी बघणार आहे, त्यामुळे हा दुर्लभ योग आहे असे म्हणता येईल!
ज्येष्ठ अमावस्येला शिवलोकाकडे नेणारे एक व्रत केले जाते :
ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी 'वृषभव्रत' नावाने एक सोहळा पार पाडला जातो, तो म्हणजे बैलपूजेचा. विधी सारखाच असला, तरी उद्दीष्ट वेगळे असते. हे व्रत आणखी एका प्रकारे केले जाते. त्यामध्ये आपल्या सोयीने कुठल्याही महिन्यात शुक्ल सप्तमीला उपवास करून अष्टमीला एका बैलाला दोन शुभ्रवस्त्रांनी वा झुलींनी तसेच गोंडे, मण्यांच्या माळा, फुलमाळा यांनी सजवून त्याची पूजा करून तो दान दिला जातो. भगवान शिवशंकरांना नंदी प्रिय आहे. त्यांचे वाहन बैल आहे. त्यामुळे या पूजेने त्यांना प्रसन्न केले जाते. आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे बैलांना अतिशय महत्त्व आहे. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण बैलपोळ्याला त्यांची पूजा करून व्यक्त करतोच. परंतु येथे 'धर्म' मानून बैलांची पूजा करण्याच्या विधीमुळे ही पूजा वेगळी ठरली आहे. आताच्या काळात शहरात बैल दिसणे दुरापास्त आहे. त्यामुळे हा पुजाविधी करणे अवघड ठरते. यावर पर्याय म्हणून लाकडाच्या बैलांची पूजा सांगितली आहे. ही पूजा सामुहिकरित्यादेखील करता येते. त्यानिमित्ताने बैलांचे पालन पोषण करणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला दान किंवा आर्थिक मदतही करता येते. कालांतराने विधी-परंपरांचे स्वरूप बदलत असले, तरी धर्म टिकवण्याच्या आणि रुजवण्याच्या दृष्टीकोनातून या तिथींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.