अधिक मासातील कमला एकादशी २८ जुलै शुक्रवारी दुपारी २. ५१ मिनिटांनी सुरु होणार आहे आणि २९ जुलै चा सूर्योदय पाहणार आहे, त्यामुळे उपास २९ जुलै रोजीच करायचा असला तरी उपासना २८ शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी करावी.
काही लोकांची वृत्ती असते उधळपट्टी करण्याची तर काही लोक अगदीच कंजूष असतात. मात्र व्यवहारी जगात दोन्ही टोकं गाठून चालत नाही, तर मध्य गाठावा लागतो. यासाठी आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे! लक्ष्मी मातेला तीच लोकं प्रिय असतात, जी आपल्या संपत्तीचा यथायोग्य वापर करतात. तर हा वापर नेमका कसा आणि कुठे करायला हवा, तेही जाणून घेऊ.
पैसा काटकसरीने वापरायला हवा आणि आपल्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीसाठीदेखील खर्चायला हवा. त्याचबरोबर पैशांची गुंतवणूक, साठवण हाही आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग असतो. जेणेकरून आपल्या पडत्या काळात मदतीसाठी दुसऱ्या कोणाच्या तोंडाकडे बघावे लागणार नाही! त्याचबरोबर सामाजिक जाणीव ठेवून आपल्या उत्पन्नाचा दशांश अर्थात दहावा भाग धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय हितासाठी खर्च करावा असे शास्त्र सांगते. यासाठी पुढे दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.
धार्मिक ठिकणी दान : धर्मकार्यात आर्थिक मदत करावी. कारण तिथे खर्च केलेला पैसा कोणाच्या व्यक्तिगत उन्नतीसाठी नसून अनेक गरजू लोकांच्या जीवनावश्यक गरजा पुरवण्यासाठी वापरला जातो. एरव्ही आपण कोणा एकाला मदत करण्यासाठी पुरे पडू शकू असे नाही, मात्र धर्मकार्यात उचललेला खारीचा वाटा आपल्याला एकाच वेळी अनेकांचे शुभाशीर्वाद मिळवून देतो.
आजारी लोकांना मदत करा - कोणत्याही व्यक्तीला मदतीची सर्वात जास्त गरज असते ती त्याच्या आजारपणात! एखाद्याला गरज असेल तर यथाशक्ती मदत जरूर करा. असे केल्याने व्यक्तीला आणि त्यांच्या रुग्णाला दिलासा मिळतो आणि नवजीवन मिळते. एखाद्याचा जीव वाचवणे हे परोपकाराचे सर्वात मोठे कार्य मानले जाते. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला आजारपणात मदत केल्याने जे पुण्य प्राप्त होते, ते यश आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडते.
गरिबांना मदत करा- गरीब आणि गरजू यातील फरक आधी ओळखा. काही लोक परिस्थितीने गरीब असतात तर काही जण गरीब असल्याचा आव आणतात. काही न करता सगळे काही फुकट मिळाल्याने ते लोक गरिबीत राहणे पसंत करतात. अशा लोकांना केलेली मदत काही उपयोगाची नाही. याउलट खऱ्या गरजवंताला केलेली मदत त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. त्यांच्या सदिच्छा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कामी येतील.
सामाजिक कार्यात दान करा- दान करण्याची इच्छा अनेकांना असते, परंतु ते सत्पात्री व्हावे असेही वाटते. काही लोक सामाजिक संस्थांना दान करून मोकळे होतात. परंतु त्या पैशांचे योग्य प्रकारे नियोजन होत आहेत की नाहीत या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे नुसते दान करून उपयोग नाही तर त्याचा पाठपुरावा देखील करायला हवा. सामाजिक संस्थाना मदत जरूर करावी परंतु त्यांचे कार्य तपासून घ्यावे आणि आपणही शक्य तेव्हा प्रत्यक्ष सहभागी व्हावे. या गोष्टी केवळ दुसऱ्यांना सहाय्यक ठरतात असे नाही तर तुमचे व्यक्तिमत्त्वही खुलवतात. आपोआप प्रसिद्धी, पैसा, यश प्राप्त होते. म्हणून आपले पैसे योग्य ठिकाणी वापरा आणि दुसऱ्यांबरोबर स्वतःचाही उत्कर्ष करून घ्या!