हिंदू मराठी महिन्यांप्रमाणे दर महिन्यात दोन एकादशी येतात. अधिक महिना दर तीन वर्षांनी येतो. हा महिना भगवान पुरुषोत्तमाचा म्हटला जातो. या महिन्यात विष्णू पूजेला महत्त्व असते. तसेच या अधिक महिन्यात दोन एकादशीदेखील अधिक येतात. ही तिथी भगवान विष्णूंना अधिक प्रिय असल्यामुळे अधिक मासात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व अधिक वाढते. मात्र या महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशीला वेगवेगळी नावे नसून एकच असतात. यंदा अधिक मासात २९ जुलै आणि १२ ऑगस्ट रोजी कमला एकादशी येत आहे. या एकादशीला महालक्ष्मीची उपासना करा असेही सांगितले जाते. ती कशी करायची ते जाणून घेऊ.
एकादशी व्रत हे भगवान विष्णूंची उपासना म्हणून केले जाते. या दिवशी सकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. देवपूजा करावी आणि भगवान विष्णूंच्या प्रतिमेची किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करावी. देवाला गंध लावावे. फुल वाहावे. विष्णू स्तोत्र म्हणावे किंवा 'शांताकारं भुजगशयनं' हा श्लोक म्हणावा. त्यांनतर जप माळ घेऊन 'ओम नमो भगवते वासुदेवाय' हे नाम १०८ वेळा घ्यावे आणि देवाला कमला एकादशी निमित्त कमळ अर्पण करावे.
त्याचबरोबर हे व्रत महालक्ष्मीच्या उपासनेसाठीही केले जाते, म्हणून या दिवशी महालक्ष्मीलादेखील हळद कुंकू वाहून कमळ पुष्प वाहावे. श्रीसूक्त म्हणावे आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करून तिचा कृपाशिर्वाद मिळवावा.
नैवेद्य : कमला एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळेस उपास असल्याने उपासाचे पदार्थ न खाता शक्यतो फलाहार करावा आणि लक्ष्मी मातेला खडीसारखरेचा नैवेद्य दाखवावा आणि विष्णूंना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला जेवणाच्या इतर पदार्थाबरोबर खोबऱ्याची करंजी करून एकादशीचे पारणे सोडावे अर्थात व्रत पूर्ती करावी.