कार्तिक महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. कारण, या महिन्यात अनेक धार्मिक विधी, सण, उत्सव पार पाडले जातात. उत्तम स्वास्थ्य, कौटुंबिक सुख, वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती, तसेच ईश्वरी कृपा मिळवण्यासाठी कार्तिक महिना अतिशय अनुकूल असतो, असे वर्णन स्कंद पुराण, नारद पुराण आणि पद्म पुराणातही केले आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विवाह त्याच्या अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीबरोबर लावून दिला जातो, म्हणून श्रीकृष्णाचा या महिन्यावर आत्यंतिक जिव्हाळा असतो. याच कारणाने, कार्तिक मासाला दामोदर मास असेही म्हणतात.
कृष्णप्रियो हि कार्तिक:, कार्तिक: कृष्णवल्लभ:।
हेही वाचा : संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह
कार्तिक मासाचे पुराणातील महत्त्व:भविष्य पुराणातील कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाला कार्तिक महिन्यात राधेची भेट घेण्यास विलंब झाला. त्यामुळे राधा कृष्णावर रागावली. वास्तविक काही कारणास्तव यशोदेने कृष्णाला घराबाहेर जाऊ दिले नव्हते. त्यामुळे कृष्णाचा काहीच दोष नव्हता. परंतु, राधेला ही परिस्थिती माहित नसल्यामुळे तिने आपल्या मनी वसलेल्या कृष्णाला लतावेलींची दोरी करून रागावून घट्ट बांधून ठेवले. मात्र, जेव्हा तिला खरा प्रसंग कळला, तेव्हा तिने कृष्णाची क्षमा मागितली आणि त्याला बंधनातून मुक्त केले. मात्र, राधेचे प्रेम आणि तिची कृष्णाची असलेली सलगी पाहून, या महिन्याला `श्रीराधा-दामोदर मास' अशी ओळख मिळाली.
पद्म पुराणात असा उल्लेख आहे, की सत्यभामाने आपल्या पूर्वजन्मात आजीवन एकादशी व्रत आणि कार्तिक व्रत नेटाने पाळले होते. त्याचेच फळ म्हणून श्रीहरी तिला पतीस्वरूपात प्राप्त झाले. सत्यभामेने व्रत, तप आणि प्रार्थना करून भगवंताला आपलेसे करून घेतले, तसे आपणही भगवंताला आपले करून घ्यावे, ही जाणीव कार्तिक मासात करून देतो.
स्कंद पुराणात कार्तिक मासाचे महत्त्व मौखिक प्रचारातून कसे पसरत गेले, याची सुरस कथा आहे. नारायणांनी ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवांनी नारदाला आणि नारदांनी महाराज पृथुला कार्तिक महिन्याचे महत्त्व सांगितले. कार्तिक महिन्यात भगवान विष्णुंची पूजा, प्रात:काळी स्नान, तुळशी पूजा, उद्यापन आणि दीपदान ही कार्तिक मास व्रताची पाच वैशिष्ट्ये आहेत. भागवत कथा, दामोदर स्तोत्र, विष्णुसहस्रनाम यांचे पठण, श्रवण या महिन्यात फलदायी असते. तसेच तुळशी पूजेच्या वेळी पुढील मंत्र लाभकारक ठरतो.
'नमो रमस्ते तुलसि पापं हर हरप्रिये'
चला तर आपणही, दामोदर मासाचे अर्थात कार्तिक मासाचे पुण्य पदरात पाडून घेऊ आणि भगवंताला आपलेसे करून घेऊ.
ओम नमो भगवते वासुदेवाय!
हेही वाचा : Adhik Maas 2020: पूजेवेळी घंटानाद का करतात, जाणून घ्या शास्त्र