Kartik Purnima 2023: मराठी वर्षात येणाऱ्या सर्व पौर्णिमांमध्ये कार्तिक महिन्याची पौर्णिमा विशेष महत्त्वाची मानली जाते. याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी महादेव शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. ही त्रिपुरारी पौर्णिमा सोमवारी आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व दुपटीने वाढले आहे. या दिवशी शंकराची विशेष उपासना, रुद्राभिषेक, नामस्मरण केले जाते. कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मी देवीची विशेष पूजा केल्यास शुभाशिर्वाद प्राप्त होऊन धन-धान्य, सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
सोमवार, २७ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्तिक पौर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमेनंतर कार्तिक पौर्णिमा लक्ष्मी देवीला सर्वांत प्रिय असल्याचे म्हटले जाते. या दिवशी विधिवत लक्ष्मीपूजन केल्यास त्याचा शुभ-लाभ मिळू शकतो. कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. हे उपाय उपयुक्त ठरू शकतात, असे सांगितले जाते. तसेच पौर्णिमा तिथी लक्ष्मी देवीचे पूजन करण्यासाठी सर्वांत योग्य मानली जाते. या दिवशी केलेल्या पूजनाने लक्ष्मी देवी खूप प्रसन्न होते आणि भक्तांना इच्छित फळ देते. घरात सुख-समृद्धी वाढते. आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.
खिरीचा नैवेद्य दाखवावा
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळ करून पिंपळाच्या झाडाला साखर मिसळलेले दूध अर्पण करावे. असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीकृपेने जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. तसेच देवी लक्ष्मीला केशर मिश्रित खिरीचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहील. लक्ष्मीची कृपा होईल, असे सांगितले जाते.
चंद्रदेवाला अर्घ्य अन् दीपदान
पौर्णिमा तिथीला चंद्रपूजानाने विशेष लाभ होतो. चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्यास चंद्रदेव तसेच लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळू शकतो. या दिवशी रात्री चंद्राला चांदीच्या भांड्यात दूध, पाणी, साखर आणि पांढरी फुले यांचा समावेश करून अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होऊ शकेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्तीचे योग जुळून येऊ शकतील, असे सांगितले जाते. तसेच कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांवर जाऊन दीपदान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. असे केल्याने श्रीविष्णूसोबतच देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे. तसेच लक्ष्मी देवीचे मंत्र, जप, स्तोत्रे यांचे पठण उपयुक्त मानले गेले आहे. - सदर माहिती सामान्य मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.