कार्तिक महिन्याला अधिक मसाइतकेच महत्त्व असते. कारण त्याला दामोदर मास असेही म्हणतात. कार्तिक महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. कारण, या महिन्यात अनेक धार्मिक विधी, सण, उत्सव पार पाडले जातात. उत्तम स्वास्थ्य, कौटुंबिक सुख, वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती, तसेच ईश्वरी कृपा मिळवण्यासाठी कार्तिक महिना अतिशय अनुकूल असतो, असे वर्णन स्कंद पुराण, नारद पुराण आणि पद्म पुराणातही केले आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विवाह त्याच्या अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीबरोबर लावून दिला जातो, म्हणून श्रीकृष्णाचा या महिन्यावर आत्यंतिक जिव्हाळा असतो. याच कारणाने, कार्तिक मासाला दामोदर मास असेही म्हणतात.
यंदा २७ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima 2023) अर्थात त्रिपुरी पौर्णिमा (Tripuri Purnima 2023) सोमवारी आल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. कारण, त्रिपुरी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, त्या विजयोत्सवानिमित्त ही तिथी साजरी केली जाते. त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण भगवान शंकराची पूजा तर करतोच, शिवाय सोमवार आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व दुप्पटीने वाढले आहे.
तुळशी विवाह : घराघरातील विवाह सोहळा सुरू होण्याआधी ज्येष्ठ कन्येच्या विवाहाला प्राधान्य दिले जाते. ही ज्येष्ठ कन्या म्हणजे आपल्या अंगणाची शोभा वाढवणारी तुळशी. श्रीकृष्णाशी तिचा विवाह लावून दिला, की त्या दोहोंच्या आशीर्वादाने घरातील शुभकार्याची सुरुवात होते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. त्रिपुरी पौर्णिमेला तुलसी विवाह मुहूर्त समाप्ती होणार आहे.
तुलसी विवाहा इतकेच कार्तिक मासात महत्त्व असते, कार्तिक स्नानाला! पुराणानुसार जे फळ सामान्य दिवसात हजारो वेळा गंगा स्नान केल्याने किंवा प्रयाग मध्ये कुंभ स्नानाच्या वेळी गंगेच्या स्नानाचे मिळते, तेच फळ कार्तिक महिन्यात सूर्योदयाच्या पूर्वी कोणत्याही नदीत स्नान केल्यानं मिळते. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात स्नानाची सुरुवात शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते. पद्म पुराणानुसार जी व्यक्ती संपूर्ण कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून नदी किंवा तलावात स्नान करते आणि भगवान विष्णू यांची पूजा करते, भगवान श्री विष्णूची कृपा त्याला मिळते. पद्मपुराणाच्या कथेनुसार कार्तिक स्नान आणि पूजेच्या पुण्याने सत्यभामाला श्रीकृष्ण यांची पत्नी होण्याचे सौभाग्य मिळाले आहेत.
कार्तिक महिन्यात स्नान आणि दानाचे महत्त्व -हा महिना धार्मिक कार्यांसाठी उत्तम मानला गेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपत केलेला दानधर्म श्रीकृष्णाच्या चरणी पोहोचतो. म्हणून या मासात गरजूंना शक्य तेवढी मदत जरूर करावी.