Kartik Sankashti Chaturthi November 2023: सन २०२३ चा नोव्हेंबर महिना अनेकार्थाने विशेष ठरत आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल पाहायला मिळाली. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याची सुरुवात संकष्ट चतुर्थीने झाली आणि आता सांगताही संकष्ट चतुर्थीने होत आहे. संकष्ट चतुर्थी ही गणेश व्रतांमध्ये सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी गणपती बाप्पाची उपासना, नामस्मरण, जपजाप, मंत्र, स्तोत्र पठण केले जाते. गणपती अथर्वशीर्ष आवर्जून म्हटले जाते.
०१ नोव्हेंबर २०२३ रोजी अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी होती. तर आता ३० नोव्हेंबर २०२३ रोजी कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीला उपवास करण्यासह बाप्पाची उपासना मनोभावे केली जाते. गणपतीचे अनेक प्रभावी मंत्र, स्तोत्रे या दिवशी म्हटले जातात. यापैकी गणपती अथर्वशीर्ष हे सर्वाधिक प्रभावी मानले जाते. काही घरांमध्ये नियमितपणे पठण केले जाते. मात्र, गणपती अथर्वशीर्ष म्हणताना काही गोष्टींचे भान ठेवावे लागते. नियम पाळावे लागतात. नियम पाळून केलेली उपासना अधिक लवकर फलद्रुप ठरू शकते, असे सांगितले जाते.
गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केलेले गणपती अथर्वशीर्ष
अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केले आहे. गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही, तर तो चराचरात, कणाकणात सामावला आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे.
आत्मरुपाची प्रचिती देणारे गणपती अथर्वशीर्ष
गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सन्निध असतो. त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरुपाची प्रचिती देणारे आहे. गणपती अथर्वशीर्षाचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
गणपती अथर्वशीर्ष पठण करताना कोणते नियम पाळायलाच हवेत?
- गणपती अथर्वशीर्ष म्हणताना उच्चार अगदी स्पष्ट असावे.
- अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.
- अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.
- देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे.
- पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे.
- स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत.
- स्तोत्राचे पावित्र्य जपण्यासाठी शुचिर्भूतता पाळावी.
- अथर्वशीर्षाचा पठण करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.
- गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी.
- पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान, स्मरण करावे, नमस्कार करावा.
- अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.
- एकापेक्षा अधिक वेळा अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा 'वरदमूर्तये नमः।' येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.
- अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.
- सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर ३,७,९,११, २१ वेळा आवर्तने करावीत. मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणा, तरच लाभ होईल.
- गणपती अथर्वशीर्ष पाठ नसेल तर श्रवण करावे. मात्र, डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवावे. जेणेकरून मन भटकणार नाही आणि उद्देश पूर्ण होईल.