२० ऑक्टोबर रोजी संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024)आहे, त्यानिमित्त आपण बाप्पाची उपासना म्हणून संकष्टीचे व्रत करतो. तसेच आश्विन महिन्यातील ही चतुर्थी अन्य कारणामुळेही महत्त्वाची ठरते, ती म्हणजे करवा चौथ (Karva Chauth 2024) या व्रतामुळे. पतीला दिर्घआयुष्य मिळावे म्हणून आपल्याकडे जसे वटपौर्णिमेचे व्रत आहे, तसे उत्तर भारतीय स्त्रिया हे व्रत करवा चौथ या नावे करतात. दिवसभर उपास आणि रात्री चंद्र दर्शन घेऊन पाणी पिणे आणि फराळ करणे असे या व्रताचे स्वरूप असते. हिंदी चित्रपटात यावर आधारित अनेक दृश्य आपण पाहिली आहेत. त्याबद्दल आपणही अधिक माहिती करून घेऊ आणि या व्रताचा महाभारताशी संबंध कसा आहे तेही जाणून घेऊ.
करवा चौथ हा शब्द आला कुठून?
तर त्यामागे आहे एक पौराणिक कथा! करवा नावाची एक पतिव्रता स्त्री नदीवर धुणं करत असताना तिथे एक मगर आली आणि त्या मगरीने तिच्या नवऱ्याला पकडले. तिने हातातले काम सोडून चक्क मगरीचा सामना करत नवऱ्याला वाचवण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. तिच्या नवऱ्याला नेण्यासाठी आलेल्या यमदूतांनी तिचे साहस पाहिले आणि यमराजाला ही माहिती दिली. तिच्या पातिव्रत्यासमोर यमराजही झुकले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला मगरमिठीतून सोडवले, तो दिवस होता चतुर्थीचा. दोघांनी मिळून चंद्र दर्शन घेतले आणि चंद्राच्या साक्षीने मिळालेले यश साजरे करण्यासाठी, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करवाने चौथचे अर्थात चतुर्थीचे वर्णन केले. तेव्हापासून अनेक उत्तर भारतीय महिला करवा चतुर्थीचे व्रत करू लागल्या.
चंद्र दर्शनासाठी चाळणीचा वापर का?
करवा नावाची महिला पतिव्रता होती, आपल्या पतीचे मुख हेच चंद्रापेक्षा अधिक प्रिय मानणारी होती. त्याच्या जीवाचे रक्षण आणि चंद्राप्रती कृतज्ञता हे दोन्ही भाव एकत्रित व्यक्त करण्यासाठी तिने चंद्राच्या कृपेने पतीचे मुख पाहता आले, म्हणून तिने छिद्र असलेल्या चाळणीतून चंद्र दर्शन घेतले आणि नंतर त्याच चाळणीतून पतीचे दर्शन घेत व्रत पूर्ण केले. तेव्हापासून चंद्र दर्शन थेट न घेता चाळणीतून चंद्र दर्शन घेण्याची प्रथा पडली. पतीवर निस्सीम प्रेम असलेल्या या भारतीय महिलेला चंद्र देखील पतीसमोर आकर्षक वाटत नाही, म्हणून त्याच्याकडे ती आडून पाहते आणि नवऱ्याचा मुखचंद्र डोळे भरून पाहते, हा भाव त्या कृतीमागे दडला असावा.
या व्रताला महाभारताचीही पार्श्वभूमी :
एकदा पांडवपुत्र अर्जुन निलगिरी पर्वतावर तपस्या करत असताना त्याच्यावर नैसर्गिक संकट आलं. त्याची तपश्चर्या भंग होऊ नये म्हणून महर्षी नारदांच्या सांगण्यावरून द्रौपदीनेदेखील हे व्रत केलं आणि अर्जुनावरचं संकट टळलं. इथेही स्त्रीचं पातिव्रत्य दिसून येतं. एकूणच हे व्रत भावनांशी निगडित आहे हे लक्षात येते.