लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली. कारण अनेकांचे रोजगार घराबाहेर पडल्याशिवाय मिळणारे नव्हते. वर्क फ्रॉम होम सर्वांनाच शक्य नव्हते. अशा वेळी काही जणांना त्यांची पूर्व पुण्याई कामी आली, काही जणांना सेव्हिंग, काही जणांनी माणुसकी अनुभवली तर काही जणांनी फक्त उपासमार! हा कठीण काळ मागे सोडून आपण सगळेच पुढे आलो, पण काही आठवणी आजही आपल्या स्मरणात राहतात. अशीच एक गोष्ट आहे एका कॅब ड्रायव्हरची.
लॉक डाऊन सुरु झाल्यावर एका कॅब ड्रायव्हरला घरी बसण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचे काम बंद झाले. घरातला पैशांचा, धान्याचा साठा संपू लागला. मुलाबाळांना काय खाऊ घालायचे या विचाराने तो वेडापिसा होऊ लागला. अशातच एक दिवस त्याला फोन आला आणि पलीकडून त्याच्या बँक अकाउंट नंबरची विचारणा झाली. मला तुम्हाला काही पैसे पाठवायचे आहेत, असे ती व्यक्ती म्हणाली. कॅब ड्रायव्हर आश्चर्यचकित झाला. ही कोण व्यक्ती कशासाठी आपल्याला पैसे पाठ्वतेय याचा विचार करण्यासाठीही त्याच्याकडे वेळ नव्हता. त्याला त्या क्षणी गरज होती, पैशांची! त्याने त्या व्यक्तीला नंबर पाठवला आणि पुढच्याच क्षणी पाच आकडी रक्कम त्याच्या अकाउंटला जमा झाली. ड्रायव्हरच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने आधी जाऊन घरात अन्नपाण्याची सोय केली आणि नंतर धन्यवाद देण्यासाठी त्या देवदूताला फोन केला आणि विचारले, तुम्ही कोण, मला मदत का केली, आपली ओळख तरी काय? यावर पलीकडून आलेल्या उत्तराने तो भारावून गेला.
पलीकडची व्यक्ती म्हणाली, 'दादा, सहा महिन्यांपूर्वी मी दिल्लीला जायला निघालेलो असताना तुमच्या कॅबने एअरपोर्टला गेलो होतो. त्यात माझा फोन तुमच्या कॅबमध्ये राहिला आणि एअरपोर्टला गेल्यावर मला त्याची जाणीव झाली. मी बाहेर येऊन बघेपर्यंत तुम्ही निघून गेला होतात. फोन महागातला नव्हता पण त्यात माझे फार महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते. त्याशिवाय दिल्लीला जाणे व्यर्थ होते. मी माझा बेत रद्द गेला आणि खिशात होते नव्हते तेवढ्या पैशात मी घरी परतलो. तिथे येऊन पाहतो तर तुम्ही उभे! हातात माझा फोन देत म्हणालात, 'तुमचा फोन द्यायलाच थांबलो होतो. एअरपोर्टवरून तुम्ही निघून गेला असलात तरी जिथून तुम्हाला पीक अप केलं तिथे घरी कोणी असेल त्यांच्याकडे फोन द्यावा म्हणून आलो पण घराला कुलूप असल्याने तासभर वाट बघून निघावं' असं म्हणत तुम्ही तिथे उभे होतात. त्याक्षणी तुम्ही लाखमोलाची गोष्ट मला शिकवलीत आणि माणुसकीवरचा माझा विश्वास वाढला. त्या उपकाराची परतफेड म्हणून मी काही रक्कम मी देऊ केली ती तुम्ही घेतली नाहीत. पण अचानक आज मला जाणीव झाली की तुमचे काम बंद झाले असेल आणि तुम्हाला आत्ता पैशांची खरी गरज असेल म्हणून मी थोडीशी मदत देऊ केली. येत्या आठ्वड्यापासून आठवड्यातून दोन वेळा ऑफिसला जायला मला कॅब लागणार आहे, तुम्ही येऊ शकाल का?
हे ऐकता क्षणी कॅब ड्रायव्हर आनंदाश्रू ढाळू लागला. पैसे मिळाले आणि रोजगार पण मिळाला. त्याच्या चांगल्या कर्माची ही परतफेड होती. म्हणूनच म्हणतात, चांगले कर्म करत राहा, त्याचे फळ लगेच मिळाले नाही तरी एक ना एक दिवस नक्कीच मिळेल हे लक्षात ठेवा!