फळाची अपेक्षा न बाळगता आयुष्यात आपण नेहमी फक्त कर्म करत राहावे. आणि ते कर्म सत्याच्या वाटेवरचं आणि कमीपणाचा अभिनिवेश मानता करणे गरजेचे आहे. शेवटी त्या कर्माचं आणि फळाचं गणित हे प्रारब्धावर अवलंबून असते.मग आपोआप गमावण्याची भीती आणि शून्यपणाची लाज गळून पडते. दुकानात कामाला असणारा एक नोकर मालकाला कोणतीही पूर्व कल्पना न देता गैरहजर राहिला. मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल. म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगाराहुन अधिक पैसे त्याला दिले. तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले. काही महिन्यानंतर परत त्याचप्रमाणे घडले. तो कोणतीही पूर्व कल्पना न देता सुट्टीवर गेला .
मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला की, याचा पगार वाढवून काय फायदा झाला? हा काही सुधारणार नाही. पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती रक्कम ठेवली . त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप तो पगार घेतला. मालकाला खूप आश्चर्य वाटलं. अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं, ''मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला. तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहिला. म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला. तरीही तू काही बोलत नाही.. असं का ? त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं. .''तो म्हणाला, मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता. तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला. दुसऱ्यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते. आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात. मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ?ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ...
.शिकवण : जीवनात काय मिळवलं आणि काय गमावलं असं जर कुणा विचारलं तर ,आवर्जून सांगा, जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती..