सध्याचा काळ असा आहे, की आधीच एकमेकांपासून मनाने दुरावलेला मनुष्य देहाने देखील परस्परांपासून दुरावत चालला आहे. पण अशाच कठीण काळात प्रत्येकाला गरज आहे एकमेकांच्या आधाराची. हा आधार कधी मानसिक असेल तर कधी आर्थिक तर कधी शाब्दिक. ज्याला यथाशक्ती मदत जमेल, तशी त्याने ती सातत्याने करत राहावी. भविष्यात आपल्यावरही मदत मागण्याची वेळ कधी ना कधी येणार आहेच. यासाठी फक्त घेण्याची नाही तर देण्याचीही हाताला सवय लावा.
विं. दा. करंदीकर लिहितात,
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे । घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ।
एकदा एक गुरुजी आपल्या शिष्याला घेऊन रानावनातून रपेट मारायला निघतात. बाह्य जगाचे आकलन व्हावे, जनजीवन कळावे, लोकांच्या समस्या कळाव्यात हा त्यामागील त्यांचा हेतू असतो. दोघे जण चालत फिरत एका शेतावरून जात असतात. एक शेतकरी घाम गाळत शेतात काम करत असतो. त्याची मीठ भाकरीची शिदोरी एका झाडाशी ठेवलेली असते आणि तिथेच फाटक्या तुटक्या चपला काढलेल्या असतात.
शिष्य म्हणतो, 'गुरुजी त्याची शिदोरी लपवू का? मला त्याची गंमत करावीशी वाटत आहे. मजा करून पाहूया का?'गुरुजी म्हणतात, 'शिदोरी लपवू नको, उलट त्यात शंभर च्या दोन नोटा ठेवून ये, मग लपून शेतकऱ्याला बघू, त्यात जास्त मजा येईल.'शिष्य गुरुजींच्या सांगण्यानुसार दोन नोटा शिदोरीजवळ ठेवून झाडामागे येऊन लपून बसतो.
थोड्या वेळाने शेतकरी येतो. मोटेवरचं पाणी पितो आणि जेवायला शिदोरी उघडतो तर काय आश्चर्य, तिथे शंभरच्या दोन नोटा त्याला आढळतात. तो सभोवताली मोठ्मोत्याने हाक मारून कोणाचे पैसे पडलेत का विचारतो. पण कुठूनही प्रतिसाद येत नाही. त्याचा नाईलाज होतो. परंतु पुढल्याच क्षणी तो देवाचे आभार मानतो. 'देवा माझ्या बायकोच्या औषधासाठी मला पैसे हवे होते. पण तू न मागता मला दिलेस. तुझे उपकार कसे विसरू?'
शिष्याला वाईट वाटते. तो गुरूंची माफी मागतो आणि म्हणतो. आधीच त्रासलेल्या व्यक्तीला आणखी त्रास देऊन मी मजा बघणार होतो. पण हा शेतकरी केवढा तरी प्रामाणिक आहे. त्याने अचानक मिळालेल्या पैशातून बायकोच्या औषधांवर खर्च करायचे ठरवून टाकले. त्याची इच्छा असती,तर त्याने ते पैसे स्वतःसाठी वापरले असते. परंतु त्याने बायकोच्या आंनदाला प्राधान्य दिले आणि त्यातून आपणही सुखी झाला.
म्हणूनच म्हणतात ना, खरा आनंद देण्यात आहे, घेण्यात नाही. आपल्या हाताला जशी घेण्याची सवय आहे, तशी देण्याचीही सवय लावून घेतली, तर अनेक गरजवंतांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होऊन होतील. आपणही स्वतःला देण्याची सवय लावून घेऊया. जेणेकरून उद्या कोणाकडे मदत मागायची वेळ आली, तर देव आणि देवदूत आपल्याकडं पाठ फिरवणार नाहीत.