आपले वैशिष्ट्य ओळखा : काय येत नाही याऐवजी काय येतंय याचा विचार करा. देवाने प्रत्येकाला काही ना काही वैशिष्ट्य दिले आहे. ते वैशिष्ट्य कोणते, हे शोधण्याऐवजी आपण आपले वैगुण्य शोधत होतो आणि नाराज होत राहतो. तसे केल्याने आपण कायम रडत राहू आणि उरला सुरलेला आत्मविश्वासही गमावून बसू. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला छान जमू शकतात त्या आणखी चांगल्या कशा करता येतील याचा विचार करा आणि त्यात परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करा.
सकारात्मक लोकांमध्ये राहा : काही लोक फक्त कुढत बसण्यात धन्यता मानतात. ते स्वतः पुढे जात नाहीत आणि इतरांना पुढे जाऊ देत नाहीत. अशा लोकांच्या भाऊगर्दीत राहण्यापेक्षा एकटे राहिलेले परवडेल. असे लोक सभोवताली असले, तरी त्यांचे बोलणे दुर्लक्षित करायला शिका. बहिरे व्हा. नकारात्मक विचार, विषय आपल्या मनात प्रवेश करू देऊ नका. सकारात्मक विचार करणारे लोक तुम्हाला प्रोत्साहन देत राहतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास हळू हळू नक्की वाढेल.
हिंमत दाखवा : अनेकदा आपल्याला आत्मविश्वासाच्या अभावामुळे जमेल की नाही हा विचार ती कृती करण्यापासून रोखतो. यासाठी आपल्या रोजच्या चौकटीबाहेर पडायला शिका. चुकलात तर अनुभव मिळेल, जिंकलात तर लोक कौतुक करतील. पण काहीच कृती केली नाही, तर संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांची प्रगती बघत संपून जाईल. म्हणून थोडीशी हिंमत दाखवा आणि स्वतःला सिद्ध करा. आत्मविश्वास नक्की येईल.