- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कीर्तन भक्तीचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. समाज जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, बंधुता, एकता, समता, विश्वात्मक भाव या मानवी मूल्यांचा विचार आचार संपन्न व्हावा आणि समाज धारणा साध्य व्हावी, ह्यासाठी महाराष्ट्रातील संतांनी कीर्तनासारखे प्रभावी माध्यम निवडले.
खरं तर कीर्तन ही मानवाला महामानव बनविणारी अद्भुत भक्ती आहे. या भक्तीची शक्ती संतांनी ओळखली आणि पंढरीच्या वाळवंटातील ममतेच्या तीरावर समतेचे नंदनवन फुलवले.
यारे यारे लहान थोर । याती भलते नारी नर ॥
अशी आर्ततेने सर्वांना साद घातली. वर्णद्वेषाच्या, जातीयतेच्या, गरीब-श्रीमंतीच्या, अहंकाराच्या आणि विकाराच्या तटभिंती जमीनदोस्त केल्या.
आपण सारी एकाच ईश्वराची लेकरं आहोत, मग आपापसांत हा वैरभाव कशाला..? हा भावानुभव कीर्तनभक्तीतूनच समाजाच्या अंतरंगात रुजविला.
नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।न लगे सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥
हा आत्मविश्वास जनमनांत जागवून विहीत कर्मातूनसुद्धा ईशतत्वाकडे जाता येते, असा दिव्य संदेश संत, महंतांनी कीर्तनभक्तीतूनच दिला.
ज्या काळात आजच्यासारख्या, किराणा दुकाने थाटावीत अशा शिक्षणसंस्था नव्हत्या, ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी मुक्त नव्हती, अशा दुर्घट काळात आबालवृद्धांच्या मुखात रामायण-महाभारतातील सुबोधकथा रंगत गेल्या त्याही कीर्तनभक्तीतूनच. आचार, विचार आणि उच्चार याला विवेकाचे भान देण्याचे काम वर्षानुवर्षे याच कीर्तनभक्तीने केले. पाखंडाचे खंडण, धर्माचे मंडण करण्याचे काम याच कीर्तनभक्तीतून संतांनी केले. समाजात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण केली. कीर्तन ही माणसा माणसातला ईश्वर जागा करणारी आणि माणसाला ईश्वराप्रत नेणारी सर्वश्रेष्ठ भक्ती आहे.
आज ही समाज जीवनात कीर्तन भक्तीचे स्थान अनन्यसाधारण आहे. याचं कीर्तन भक्तीला ज्ञानोबा, नामदेव आदि संतांनी परमोच्च स्थान प्राप्त करून दिले.
नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।सर्व सांडूनी माझा ही । वाचे विठ्ठल रखुमाई ॥
असे वर्णन नामदेवांनी केले. कीर्तन हे ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचे श्रेष्ठतम साधन आहे..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )