शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचा देवेंद्र फडणवीसांना 'कानमंत्र'; मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच भेट
2
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, पुढच्याच आठवड्यात संसदेत सादर करण्याची तयारी
3
"शांतपणे प्रायव्हेट प्लेननं निघा अन्...!" पुतिन यांनी असद कुटुंबाला कसं काढलं सीरियाबाहेर? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी
4
'आप'लाही आता 'बहिणी' झाल्या 'लाडक्या'! महायुतीच्या पावलावर पाऊल टाकत केली २१०० रुपये देण्याची घोषणा
5
हिटमॅनला 'फॅट'मॅनचा टॅग! माजी क्रिकेटर म्हणतो; विराटला बघा! रोहित शर्मा फक्त...
6
अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान
7
"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
8
मार्गशीर्ष पौर्णिमा: अत्यंत शुभ योगात लक्ष्मी कृपेसाठी ‘ही’ ३ कामे अवश्य करा; भरभराट होईल!
9
डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, पण आशा सोडली नाही; ४ महिन्यांत क्रॅक केली UPSC, झाली IAS
10
Sharad Pawar: दिल्लीत १० दिवसांपूर्वीच पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट?; राजकीय उलथापालथीची चर्चा
11
शुक्र-शनी युती: ७ राशींना अपार लाभ, नवीन नोकरीची ऑफर; शेअर बाजारात नफा, वरदान काळ!
12
BLOG: हम गया नहीं जिंदा है, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; अशक्यही शक्य करणारे स्वामी
13
Ajit Pawar :- वाढदिवसाच्या शुभेच्छा अन्...; शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांचं सूचक विधान
14
आधी लेग ब्रेक, मग पकडला वेग! नेट्समध्ये अगदी नेटानं गोलंदाजी करताना दिसला बुमराह (VIDEO)
15
'रामायण'मधील सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने खरंच नॉनव्हेज सोडलं? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
16
आईची हत्या, ६ दिवस मृतदेह घरात, वडील येताच...; अल्पवयीन मुलाच्या कृत्याने सर्वांनाच मोठा धक्का
17
दिल्लीत अजित पवारांसह NCP च्या प्रमुख नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण
18
"माझा पगार काढून घ्यायचा, दारू पिऊन मला मारायचा"; अतुल सुभाषवर पत्नीने केले होते गंभीर आरोप
19
Emerald Tyre Manufacturers : पहिल्याच दिवशी १००% चा रिटर्न, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१८९ वर आला भाव
20
"बेकायदेशीर असतं तर नकार...", सोनाक्षीच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांची शॉकिंग प्रतिक्रिया

BLOG: हम गया नहीं जिंदा है, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; अशक्यही शक्य करणारे स्वामी

By देवेश फडके | Published: December 12, 2024 12:18 PM

Datta Jayanti: दत्त जयंतीनिमित्त दत्तगुरुंचा अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतारकार्याविषयी जाणून घेऊया...

Datta Jayanti: दत्तात्रेयांचे श्रीपाद श्रीवल्लभ हे बालस्वरुपातील अवतार होते. तर श्रीनृसिंह सरस्वती महाराज हे वडील अवतार होते. श्रीनृसिंह सरस्वती महाराज गुप्त झाल्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी श्री स्वामी समर्थ स्वरुपात प्रकट झाले. श्री स्वामी समर्थ हा दत्तात्रेयांचा ज्येष्ठ अवतार असल्याचे मानले जाते. इतर दोन अवतारांच्या तुलनेत स्वामींचा अवतार काही काळापूर्वीचाच आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही स्वामी दर्शन घेतल्याच्या नोंदी आढळून येतात. आजमितीलाही स्वामींच्या अद्भूत लीलांचा स्वानुभव घेणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अबालवृद्धांना आपलेसे वाटणारे हे दैवत आजही अनेकांना मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले जाते. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामींबद्दल अनेक ठिकाणी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व्यापक, विस्तृत आणि कालातीत चरित्राचा थोडक्यात आढावा घेऊ...

श्रीदत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीनंतर श्रीनृसिंह सरस्वती कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. याला तीनशेहून अधिक वर्षे झाली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूडतोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले, अशी कथा सांगितली जाते. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते आजानुबाहू होते. प्रकट झाल्यानंतर स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. सर्वत्र भ्रमण करून झाल्यानंतर स्वामी अक्कलकोटला आले आणि अवतारकार्याची सांगता होईपर्यंत याच ठिकाणी वास्तव्यास राहिले. सर्वसामान्य भाविक भक्तांना स्वामींनी आपलेसे केले. सर्व जाती-पातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. 

इंग्रजांच्या राजवटीत जनतेचा आत्मसन्मान जागृत ठेवला

स्वामींच्या अवतारकार्य काळात भारतात इंग्रजांची राजवट सुरू होती. इंग्रज शासनाच्या वरवंट्यांमध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. स्वामींचा शिष्य परिवारही मोठा आहे. स्वामींनी भक्तांना अनेकविध रुपात दर्शन देऊन तृप्त केले. स्वामींनी कधी अन्नपूर्णा मातेच्या स्वरुपात दर्शन दिले, तर कधी श्रीकृष्णाच्या स्वरुपात दर्शन दिले. तर कधी श्रीनृसिंह सरस्वती, दत्तात्रेयांच्या स्वरुपात दर्शन देऊन भाविकांची इच्छा पूर्ण केली. भक्तांची त्यागाची, समर्पणाची पात्रता पाहून, प्रसंगी परीक्षा घेऊन स्वामींनी अनेकांचा उद्धार केला. वेळेच्या आधी आणि विधिलिखितापेक्षा जास्त काहीच मिळत नाही, हे स्वामींनी वेळोवेळी दाखवून दिल्याचे सांगितले जाते. 

स्वामी समर्थांचे तेजस्वी शिष्य आणि दैवी परंपरा

काही मान्यतांनुसार स्वामींचे तीनशेहून अधिक शिष्य होते. यामध्ये बीडकर महाराज, शंकर महाराज आणि काळबोवा (पुणे), नृसिंह सरस्वती (आळंदी), सीताराम महाराज (मंगळवेढे), साईबाबा (शिर्डी), देवमामलेदार (नाशिक), रांगोळी महाराज (मालवण), श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापूर), स्वामीसुत (मुंबई), बाळप्पा महाराज (अक्कलकोट), ब्रह्मनिष्ठ वामनबुवा (बडोदे), धोंडिबा पलुस्कर (पलुस) आणि गजानन महाराज (शेगांव) आदी अनेक नावे अगदी सहजपणे सांगता येतील. या शिष्यवृंदांची चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात, असे सांगितले जाते. कोणताही विधी न करता, स्वशिष्याचा सर्वोद्धार व्हावा अशा नुसत्या संकल्पानेच त्याला कृतार्थ करणे, जीवन्मुक्त करणे या दीक्षाप्रकाराला संकल्प दीक्षा असे म्हणतात. यातून स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांचे मार्गदर्शन केले असे म्हटले जाते. स्वामी महाराजांच्या या तेजस्वी शिष्य परिवाराने दत्तभक्ती आणि स्वामी महाराजांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मठांची स्थापना केली. विदर्भ, मराठवाडा, जळगाव, मुंबई, पुणे, ठाणे, कोकण, उर्वरित महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक- बेळगाव, कारवार, गुजरात सुरत, बडोदा, मध्यप्रदेश अशा अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले. स्वामी महाराजांच्या शिष्यांव्यतिरिक्त अनेक स्वामींप्रेमी सत्पुरुष, संत निर्माण झाले. ज्यांनी स्वामीभक्ती प्रसारासाठी विविध ठिकाणी जागृत मठ स्थापन केले. लक्षावधी लोक स्वामी महाराजांच्या दर्शनास येत असत. हिंदुस्थानाच्या चारही टोकांकडील व साऱ्या धर्मांतील लोक स्वामींच्या दर्शनास येत असत. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले असे संस्थानिक त्यांच्या भजनी होते. नवरोजी शेट, सय्यद आणि अहमदअल्ली रिसालदार, त्याचप्रमाणे जैन, लिंगायत, वैष्णव, वारकरी, संन्यासी, सुधारक, सनातनी, शास्त्री, हरिदास अशा अनेकांनी त्यांच्या पायी आपले मस्तक नमविले. वारंवार होणाऱ्या लीला, चमत्कारांनी महाराज सर्वज्ञ आहेत व ते सर्वशक्तिमान आहेत, अशीही आर्त जीवांची खात्री झाली. चोळाप्पा आणि बाळाप्पा, सुंदराबाई आणि काकुबाई, मालोजी आणि दादाजी भोसले, सबनीसबाबा आणि मराठेबाबा, बाळकृष्ण आणि कृष्णाप्पा यांसारखे अनेक शिष्य स्वामी सेवेसाठी कायम तत्पर असत.

श्री स्वामी समर्थांचे स्वरुप नेमके कसे आहे?

स्वामी अद्भुत आहेत.  स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. ते सर्वशक्तीमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी 'अवधूत' म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अव्यक्त आहेत. स्वामी ॐकारातील पहिला स्वर 'अ'कार, म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे, अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम (सर्वोत्कृष्ट) आहेत. स्वामी तपोमय अजर यतिश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी सर्वसाक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील 'अर्थ', आनंद, प्रेम आणि 'सुख'रूप  आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी निरालंबासनी आहेत. म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी अमुख्य आहेत. म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाही. ते निर्मोही, निरहंकारी, तुल्यनिंदा, स्तुतिमौनी व निर्विकारी 'साक्षी' आहेत. स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तीरूप व्यक्त होतात. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत. स्वामी भावविनिर्गत आहेत, म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. स्वामी चिन्मय-चैतन्यरूप आहेत. स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत. स्वामी ब्रह्मांडनायक आहेत. 

'श्री स्वामी समर्थ'चा नेमका अर्थ काय?

षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुचरित्र हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याच प्रमाणे समानार्थी 'श्री स्वामी समर्थ' हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. ह्या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धिकरण योगातून सहजच होते. श्री स्वामीं समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा मथितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यययोग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व आधिक प्रभावकारक होत असतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. श्री - स्वयं श्रीपादविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज...! स्वामी - स्वाः + मी स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या...! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. समर्थ - समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा...!  त्यायोगे 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभु शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.

स्वामी समर्थांची आशीर्वचने

१. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.  २. जो माझी अनन्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. 

३. आळशी माणसाचे तोंड पाहू नये. 

४. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. 

५. जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.

६. भिऊ नकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.

७. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा, राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.   

८. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा. 

९. हम गया नहीं जिंदा हैं.

हम गया नहीं जिंदा हैं या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य ऐकले, वाचले तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते. विस्कटलेले काम योग्य मार्गी लागते. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या अभय वचनाने तर सर्व भीतीच संपवली आहे. वाईट गोष्टींशी, संकटांशी बिनदिक्कत लढा, या युद्धात पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील, तुम्हीही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील, लढण्याची ताकद देतील शेवटी विजय तुमचाच आहे, अशी असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रकटलेल्या या परब्रह्ममूर्तीने, अतर्क्य, अद्भुत आणि बोला-बुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून, चैत्र कृष्ण त्रयोदशी, ३० एप्रिल १८७८ रोजी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. स्वामी महाराजांनी आपल्या अवतारकार्यात असंख्य लीला केल्याचे म्हटले जाते. स्वामींबद्दल कितीही लिहिले, वाचले, ऐकले तरी कमीच आहे. स्वामींबद्दल भरभरून बोलणारे हजारो लोक आजूबाजूला सहज सापडतील. निरंतर निश्चयाने स्वामीभक्ती, स्वामीसेवा करणारेही हजारो भाविक आहेत. स्वामी होते, स्वामी आहेत अन स्वामी असणारच आहेत!... 

या पुढील भागात गुरुचरित्र या अद्भूत ग्रंथाविषयी जाणून घेऊया...

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 

- देवेश फडके.

टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीshree datta guruदत्तगुरुshree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिक