ज्योतिषशास्त्रात जसे ग्रहांना महत्त्व आहे, तसेच ते त्यांच्या रत्नांनाही आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रह कमकुवत असेल, तर एखादे विशिष्ट रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार त्या व्यक्तीला संबंधित रत्न धारण करण्यास सांगितले जाते. यामुळे समस्यांचे निराकरण होऊ शकते किंवा एखाद्या ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते, असे सांगितले जाते. मात्र, काही वेळेस परस्परविरोधी गुणधर्म असलेली रत्ने एकत्र धारण केल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतात, असा दावा केला जातो. त्यामुळे रत्न धारण करताना किंवा दोन रत्ने एकत्र धारण करताना योग्य काळजी घ्यावी, असे म्हटले जाते. तुम्ही तर भिन्न गुणधर्माची रत्ने धारण केली नाहीत ना? जाणून घेऊया...
काही रत्ने एकमेकांना पूरक मानली जातात. तर काही रत्ने एकत्र धारण केल्याने त्याचा अपेक्षित परिणाम मिळतोच असे नाही. त्यामुळे एखादे रत्न धारण करताना तज्ज्ञ व्यक्तींचा आवर्जुन सल्ला घ्यावा, असे सांगितले जाते. असे केल्याने रत्न धारण करण्याचे अपेक्षित परिणाम साध्य होऊ शकतात, असे म्हटले जाते.
मोती रत्नासह हिरा, पाचू, गोमेद, नीलम एकत्र धारण करू नये
एखाद्या व्यक्तीने मोती रत्न धारण केले असेल, तर त्यासोबत म्हणजेच एकत्रितरित्या हिरा, पाचू, गोमेद, लहसुनिया आणि नीलम धारण करू नये, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मोती रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, सदर रत्ने एकत्र धारण केल्यास मानसिक समस्या उद्भवू शकतात, असे सांगितले जाते.
पाचू रत्नासह पुष्कराज, पोवळे, मोती एकत्र धारण करू नये
एखाद्या व्यक्तीने पाचू रत्न धारण केले असेल, तर त्यासोबत एकत्र पुष्कराज, पोवळे आणि मोती धारण करू नये, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, पाचू रत्न बुधाचे असून, यामुळे या ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते. मात्र, पाचूसह वरील रत्ने एकत्र धारण केल्यास आर्थिक आघाडीवर परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जाते.
नीलम रत्नासह माणिक, पोवळे, मोती, पुष्कराज एकत्र नको
एखाद्या व्यक्तीने नीलम रत्न धारण केले असेल, तर त्यासोबत एकत्रितरित्या माणिक, पोवळे, मोती आणि पुष्कराज धारण करू नये, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, नीलम शनी ग्रहाचे रत्न असून, शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी नीलम रत्न धारण करण्यास सांगितले जाते. मात्र, नीलम रत्नासह वर दिलेली रत्ने धारण केल्यास जीवनात संघर्ष करावा लागू शकतो, असे सांगितले जात आहे. सदर दिलेली माहिती मान्यतांवर आधारित असून, कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.