सुखी, समृद्धी आणि आनंददायी जीवनासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. कोणत्याही वयोगटातील, समाजाच्या कोणत्याही स्तरातील व्यक्तीला शांततामय आणि चांगले जीवन हवे असते. त्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. ताण-तणाव विरहीत जीवन जगता यावे, यासाठी माणूस कायम काही ना काही करत असतो. आपल्याला सुख, समाधान मिळाले आले नाही, तर किमान आपल्या मुलांना मिळावे, म्हणून मेहनत, परिश्रम घेत असतो. जीवनात सुख, समृद्धी, आनंद हवा असेल, तर गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पाच गोष्टींचे आचरण, पालन आवर्जुन करावे, असे म्हटले जाते. खुद्द गौतम बुद्धांनी एका प्रसंगात त्या पाच गोष्टी कोणत्या हे समजावून सांगितले आहे. जाणून घेऊया...
मर्यादेचे ‘लॉक’ आणि अपेक्षा ‘डाऊन’; सुखी, समृद्ध जीवनाचे सोपान
यश नावाचा एक तरुण बनारस येथील श्रीमंत घरात, अगदी सुखात वाढला होता. त्याच्या वडिलांचे नाव श्रेष्ठ होते. यशच्या घरात सुख, सोयी, समृद्धी यांची बिलकूल कमतरता नव्हती. एका रात्री मित्रांसोबत जेवण केल्यानंतर नृत्य पाहता पाहता तेथेच त्याचा डोळा लागला. मध्यरात्री अचानक त्याला जाग आली. पाहतो तर, त्याचे मित्र नर्तकींसोबत बेधुंद अवस्थेत पडले होते. ते दृश्य पाहून त्याला या सर्व प्रकाराची घृणा वाटू लागली. तत्काळ तो तेथून निघाला आणि वाट मिळेल तेथे धावत सुटला. जंगलात खूप वेळ भटकल्यानंतर एका झाडाखाली गौतम बुद्ध ध्यानस्थ बसलेले दिसले. यश त्यांच्यापाशी गेला आणि गौतम बुद्धांना सांगू लागला की, या जगात सर्वकाही घृणास्पद आहे. चांगले काहीच नाही.
यशचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. नेमका प्रकार जाणून घेतला आणि गौतम बुद्ध त्याला म्हणाले की, जगभरात अनेकविध चांगल्या गोष्टी आहेत. वृक्षांची सुंदरता पाहा. नदी, पर्वत, तारे-तारका, चंद्र आणि सूर्यही पाहा. पक्षांची किलबिल, वाऱ्याचा मंजूळ ध्वनी, खळाळत्या पाण्याचा नाद. या सर्वांतून आपल्याला निखळ, निर्मळ आनंद मिळतो. निसर्गाच्या या अद्भूत सौंदर्याला अजून आपण नीटसे पाहिलेले दिसत नाही. केवळ आजूबाजूच्या गोष्टींवरून तर्क लावणे चुकीचे आहे. आपल्या जीवनातील दुःख हे चुकीचे आचरण आणि चुकीच्या धारणा यांमुळे अधिक येते, असे गौतम बुद्ध म्हणाले.
'हे' आहेत समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले ११ मारुती
यशचे वडील त्याला शोधत शोधत आले. गौतम बुद्धांच्या विचारांनी तेही प्रभावित झाले आणि त्या दोघांनी बुद्धांचे शिष्यत्व पत्करले. सुखी जीवन जगायचे असेल, तर कोणत्या गोष्टींचे आचरण आवश्यक आहे, असे गौतम बुद्धांना विचारले असता, ते म्हणाले की, अहिंसा, अचोर्य म्हणजे चोरी न करणे, इंद्रिय भोग विरक्ती, असत्य कथन न करणे आणि मदिरा म्हणजेच उत्तेजक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे. या पाच गोष्टींचे आचरण केल्यास आपण नेहमी सुखमय जीवन जगू शकाल, असे गौतम बुद्धांनी सांगितले. गौतम बुद्धांच्या याच आचरणांना पंचशील म्हटले जाते.