Swami Samarth Mantra Pushpanjali: श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते सर्वशक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी 'अवधूत' म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे, अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. ते सर्वसाक्षी आहेत. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत. स्वामी परमेश आहेत.
स्वामी समर्थांचा अनुभव अनेकांना आलेला आहे. अनेक जण स्वामींच्या अनुभवाबाबत भरभरून बोलतात. स्वामींची मनापासून पूजा, उपासना, आराधना, भक्ती करतात. नित्यनेमाने स्वामींचे स्मरण, नामजप, मंत्र पठण करतात. स्वामींचे पूजन, आरती झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मंत्रपुष्पांजली आवर्जून म्हणावी, असे सांगितले जाते. आपल्याकडे आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्याची परंपरा आहे. मंत्रपुष्पांजली ही आरतीच्या शेवटी गायली जाणारी प्रार्थना आहे. याचा एक अर्थ "फुलांची ओजळी अर्पण करणे" असा होतो.
स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली
पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा।ओंकाराकारा परात्परा गुरो आम्हा तुझा आसरा।।मूलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी।देवा विघ्न हरी आम्हावरि करी, आडो न माया गुणी॥१॥
आनंदकंद विमला ज्ञानस्वरुपा।साक्षी सदैव हृदयस्थ ही मायबापा।।स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्व तापा।दावि स्वरूप मज लावूनी ज्ञानदीपा॥२॥
धर्मग्लानि कराल काल कली हा शास्ता नुरे या मही।तत्वाचा लव मागमूस न दिसे धुंडूनि सत्वातहि।।भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजयदत्त हा।होई लीन अनन्यभावे चरणी वंदी सदा दास हा॥३॥
विधीहरिहर हे एकरूपे मिळाले।परमगुरुस्वरूपे देखता नेत्र घाले।।अनुपम तव प्रीती लीन होताती भक्तं।तव पद झणि देशी धन्य तू एक दत्त॥४॥
परमात्मा पुरूषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा।लीलाविग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा।।ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा।अर्पितसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगतगुरुवरा॥५॥
ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझिया पदा।ओंकारस्वरूपा तू वेद जननी दुरवी न आम्हा कदा।।भावे ज्या भजता भिउनि पळती दैन्यादि सर्वापदा।गायत्री सुमने नमू करी कृपा आम्हावरी सर्वदा॥६॥