Numerology: ज्योतिषशास्त्राला प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येऊ शकतात. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. फक्त जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. नियमित कालावधीने ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. त्याचा प्रभाव मूलांकांवरही पडत असतो, असे सांगितले जाते.
अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरुन व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो. तसे प्रत्येक मूलांकाला ग्रहांचे स्वामित्व बहाल केले आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ किंवा २८ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक १ आहे. सूर्य हा मूलांक १ चा स्वामी आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य सुमारे एक महिना एक राशीत विराजमान असतो. नवग्रहात सूर्याचा अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. एप्रिल महिन्यात नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मेष राशीत विराजमान झाला आहे. मेष ही सूर्याची उच्च रास आहे, या राशीत सूर्य सर्वोत्तम फले देऊ शकतो, असे म्हटले जाते.
चांगले उद्योगपती, पैशाची कमतरता भासत नाही
मूलांक १ असलेल्या व्यक्ती उत्तम उद्योगपती होऊ शकतात. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे, भाषणाची क्षमता आणि वेळेची बांधिलकी यामुळे या व्यक्ती व्यापार, व्यवसाय आणि उद्योगात चांगली प्रगती करतात. आपले प्रत्येक काम चोखपणे करतात. मूलांक १ असलेल्या लोकांना सर्व कामे शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची सवय असते. तसेच वेळेचे व्यवस्थापन, कौशल्य आणि नेतृत्वाच्या गुणवत्तेमुळे या व्यक्ती राजकारण, व्यवस्थापन क्षेत्रात उच्च पदांपर्यंत जातात. या मूलांकांची आर्थिक स्थिती चांगली असते. पैशाची कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते.
निर्भय, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात
ज्या व्यक्तींचा मूलांक १ आहे, त्या स्वभावाने अतिशय मनमिळावू आणि साध्या असतात. इतकेच नाही तर असे लोक अन्य लोकांशी लवकरच जवळीक वाढवतात. आपल्या गोड बोलण्याने आणि साध्या वागण्याने समोरच्या व्यक्तीचे मन पटकन जिंकतात. या मूलांकाच्या व्यक्ती त्यांच्या कृती आणि बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकतात. या व्यक्ती प्रामाणिक मानल्या जातात. निर्भय, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात. जीवनात येणाऱ्या अडचणींना ते घाबरत नाहीत, असे सांगितले जाते.
खूप प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्ती मानल्या जातात
अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा मूलांक १ असतो, त्या खूप प्रभावशाली आणि प्रतिष्ठित मानल्या जातात. मूलांक १ असलेल्या व्यक्तींसाठी रविवार आणि सोमवार हे शुभ दिवस मानले जातात. तसेच मूलांक १ असलेल्या व्यक्तींसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"