भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. ज्योतिषशास्त्र असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्र हा कला, कलात्मकता, साहित्य, संगीत यांचा कारक मानला जातो. मूलांक ६ असलेल्या लोकांना जीवनातील सर्व सुख-सुविधा मिळतात, असे मानले जाते. एकदा ठरवलेल्या कामात यश मिळवूनच ते थांबतात. ते कठोर परिश्रम करतात आणि खूप वेगाने पुढे जातात. ते जीवनात भरपूर पैसा कमावतात. धनदेवता कुबेराची या मूलांकाच्या व्यक्तींवर विशेष कृपा असते. या व्यक्ती ज्या कामात हात घालतात, त्यात यश मिळवू शकतात, असे सांगितले जाते.
जोखमीची कामे करण्यात असतात पारंगत
मूलांक ६ असलेल्या व्यक्ती जोखमीची कामे करण्यात पारंगत असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच या व्यक्ती व्यवसायात चांगले काम करतात, यश मिळवतात. वाचन आणि लेखनात या व्यक्ती हुशार असतात. शैक्षणिक क्षेत्रातही खूप चांगली प्रगती या व्यक्ती करतात. संगीत आणि कलेची या व्यक्तींना विशेष आवड असते. या क्षेत्रातही या व्यक्ती नावलौकिक कमावतात. या व्यक्तींचा स्वभाव आनंदी असतो. त्यांना नेहमी एकत्र राहायला आवडते.
पैसे कमावण्याच्या असतात एक्सपर्ट
मूलांक ६ असलेल्या व्यक्ती पैसे कमवण्यात आणि धनसंचय करण्यात पटाईत असतात. पैसे केव्हा आणि कुठे गुंतवायचे याचे त्यांना चांगले ज्ञान असते आणि त्याचा फायदा त्यांना मिळतो. कामाच्या ठिकाणी लोकप्रिय असतात, कौतुकास पात्र होतात. सर्व जण त्यांची स्तुती करतात. या व्यक्तींची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. या व्यक्तींमध्ये पैसे कमवण्याचा ध्यास असतो. पैसे कमावण्याच्या योजना बनवण्यातही ते तज्ज्ञ मानले जातात. एकंदरीत त्यांची आर्थिक स्थिती नेहमीच चांगली असते.