भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात मानवी जीवनावरील अनेकविध गोष्टींवर भाष्य केले जाते. अंदाज वर्तवले जातात. ज्योतिषशास्त्र असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८ आणि २७ तारखेला झालेला आहे, अशा व्यक्तींचा मूलांक ९ असतो. मूलांक ९ चे स्वामित्व मंगळ ग्रहाकडे आहे. मूलांक ९ असलेल्या व्यक्ती धैर्यवान, संयमी असल्याचे मानले जाते. या मूलांकाच्या व्यक्ती सर्वाधिक भाग्यवान असल्याचे सांगितले जाते. जर या मूलांकाच्या व्यक्तींनी एखाद्या कामात आपले १०० टक्के दिले तर त्यांना उच्च दर्जा मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यामुळेच त्यांना अपार यश आणि प्रगती साध्य करता येऊ शकते. माणुसकी, उदार आणि सहिष्णू व्यक्ती
मूलांक ९ असलेल्या व्यक्तींमध्ये माणुसकी असते आणि त्यांच्यात सहिष्णुता, उदारताही असते. या व्यक्तींना कला आणि गूढ शास्त्रांमध्ये चांगली रुची असते. या व्यक्ती जास्त पैसे खर्च करत नाहीत. त्यांची आर्थिक स्थिती आयुष्यात सामान्य राहते. हे लोक धर्मादाय इत्यादींमध्ये खूप पैसा खर्च करतात. त्यांच्याकडे कलात्मकता आणि नाट्य प्रतिभा, तसेच लेखन प्रतिभा असते. या मूलांकाचे लोक खूप आक्रमक आणि तापट असतात, असे म्हटले जाते.
अध्यात्माची आवड, क्षमाशील व्यक्तिमत्त्व
मूलांक ९ असलेल्या व्यक्तींमध्ये आध्यात्मिक जीवन जगण्याची क्षमता आणि विशेषता असते. जन्मतःच त्यांचा देवाकडे कल असतो. हे लोक निःस्वार्थपणे लोकांची सेवा करतात आणि क्षमाशील असतात. या राशीचे लोक जास्त काळ कोणतीही गोष्ट मनामध्ये ठेवत नाहीत. त्यांच्यातील सर्वात चांगली गोष्ट ही आहे की ते त्यांच्या दु:खाचा जास्त काळ विचार करत नाहीत. या मूलांकाच्या व्यक्तींचे जीवन संघर्षमय असते. अनेक वेळा त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण होते. मात्र, संयम बाळगून जीवनाला शिस्त लावून ते यशस्वी होऊ शकतात. यासाठी रोज ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरू शकते, असा सल्ला दिला जातो. मात्र, सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, जन्मकुंडली किंवा अंकशास्त्राविषयी अधिक सविस्तर माहिती तज्ज्ञ व्यक्तींकडून घ्यावी.