ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८ किंवा २७ तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ ग्रह हा नवग्रहातील सेनापती तसेच क्रूर मानला गेला आहे. परंतु, मंगळाचे शुभाशिर्वाद लाभले, तर रंकाचा रावही होऊ शकतो, अशी मान्यता आहे. मूलांक ९ असलेल्या व्यक्तींवर लक्ष्मी देवीची कृपा असल्याचे मानले जाते.
मूलांक ९ असलेले लोकं शिस्तप्रिय आणि तत्त्वांवर ठाम असतात. त्यांचे जीवन काहीसे संघर्षमय असते. पण या लोकांमध्ये सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याची ताकद असते. मूलांक ९ असलेल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर ते खूप पैसे खर्च करतात. रिअल इस्टेटच्या बाबतीत हे लोक भाग्यवान ठरतात. सासरच्या मंडळींकडूनही त्यांना पैसे मिळतात. ते खंबीरपणे सामोरे जातात. हे लोक धोका पत्करून पैसे कमवतात, असे म्हटले जाते.
मूलांक ९ असलेल्या लोकांना सामान्यतः अभियंता, डॉक्टर, राजकारण, पर्यटन किंवा वीज संबंधित कामात यश मिळते. प्रेमसंबंधात अडचणी येतात. कधीकधी रागामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येतो. वैवाहिक जीवन संकटांनी भरलेले आहे, असे सांगितले जाते.
मूलांक ९ असणाऱ्या व्यक्तींनी हनुमंताची पूजा करावी, असा सल्ला दिला जातो. तसेच समस्या, अडचणी दूर होण्यास ते उपयुक्त ठरू शकते. कौटुंबिक समस्यांसाठी मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांडचा पाठ करणे लाभदायक ठरू शकते, असे म्हटले जाते. याशिवाय, हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्यास आर्थिक समृद्धी, मान-सन्मान आणि कीर्ती प्राप्त होते, असेही सांगितले जाते.