ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून व्यक्तीविषयी अंदाज बांधले जाऊ शकतात. अंकशास्त्र, समुद्रशास्त्र, होराशास्त्र यासह ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाची शाखा म्हणजे हस्तरेषशास्त्र. (Palmistry) तळहातावरील उभ्या, आडव्या रेषा, पर्वत, उंचवटे यांचा अभ्यास केला जातो आणि यावरून भविष्यकथन किंवा काही अंदाज बांधले जातात. तळहातावरील काही रेषांना ठराविक नावे देण्यात आलेली असतात. यावरून जीवन, साधन- संपत्ती, करिअर, कुटुंब यांबाबत तर्क लावले जाऊ शकतात.
तळहातावर अनेक रेषा आहेत, ज्यात मुख्य म्हणजे धनरेषा, जीवनरेषा, हृदयरेषा आणि विष्णुरेषा. असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या हातात विष्णू रेखा असते त्यांना भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची कृपा लाभते. यासोबतच त्यांना जीवनातील सर्व सुख-सुविधा मिळतात. ज्या व्यक्तींच्या तळहातावर विष्णूरेषा असते, त्यांना आयुष्यात खूप यश मिळू शकते.
तळहातावर नेमकी कुठे असते विष्णूरेषा?
हस्तरेषा शास्त्रानुसार जेव्हा व्यक्तीच्या तळहातातील हृदय रेषेतून एखादी रेषा बाहेर पडून गुरु पर्वतावर जाते आणि ही हृदयरेषा दोन भागात विभागली गेली तर तिला विष्णूरेषा म्हणतात. या व्यक्तींना महागड्या वस्तू खरेदी करण्याचा छंद असतो आणि त्यांची आर्थिक स्थिती नेहमीच मजबूत राहू शकते. या व्यक्तींना कार्यक्षेत्रात मोठे स्थान मिळू शकते. समाजात खूप आदर मिळू शकतो.
प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातात
ज्या व्यक्तींच्या तळहातावर विष्णूरेषा असते, त्या व्यक्ती धैर्यवान आणि निडर असतात. त्याचबरोबर ते प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातात. समाजातही ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. तसेच, या व्यक्ती मनमोकळ्या आणि स्पष्टवक्त्या असतात. ज्या ध्येयाचा विचार करतात, ते साध्य केल्यानंतरच या व्यक्ती थांबतात आणि त्या ध्येयासाठीच त्या जगतात.