Shree Swami Samarth Maharaj: अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज कोट्यवधी भविकांचे श्रद्धास्थान आहेत. नित्यनियमाने स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. दररोज कोट्यवधी घरांमध्ये स्वामींचे पूजन केले जाते. राज्यासह देश-विदेशात स्वामींचे मठ, मंदिरे आहेत. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो.
स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाल्यावर प्रत्येक जण काही ना काही तरी मागणे मागत असतो. आपल्या अडचणी, समस्या, गाऱ्हाणी स्वामींकडे मांडत असतो. त्यातून मुक्तता मिळावी, दिलासा मिळावा, यासाठी स्वामींची करुणा भाकत असतो. स्वामींची कृपा व्हावी, स्वामींनी गाऱ्हाणे ऐकून मदतीला धावून यावे, असे भाविक मागत असतात. परंतु, स्वामींच्या दारात गेल्यानंतर, स्वामी चरणी नतमस्तक झाल्यानंतर ब्रह्मांडनायक सद्गुरू परमेश्वराकडे नेमके काय मागावे, हेच अनेकांना कळत नाही, समजत नाही, असे म्हटले जाते.
स्वामींच्या दारात जाऊन काय मागावे, हे कळले पाहिजे
सद्गुरूच्या अर्थात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे, याचा विचार अनेकदा आपण करत नाहीत. स्वामींच्या दारात गेल्यावर आपण काय मागतो, तर महाराज मला कार द्या, वाहन द्या, महाराज बंगला द्या, महाराज मला ऐश्वर्य द्या. पण लक्षात ठेवा की, सुख, समृद्धी, शांतता, आयुरारोग्य, संतती, संपत्ती, जय-लाभ, काम-धर्म-अर्थ-मोक्ष देणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन आपण काय मागतो, जो ऐश्वर्याचा अधिपती आहे, जो ब्रह्मांडाचा नायक आहे, त्या नायकाच्या दारात जाऊन काय मागावे, हे आपल्याला कळले पाहिजे.
परमेश्वराकडे खरेच काय मागायचे असेल, तर...
परमेश्वराकडे खरेच काय मागायचे असेल, तर त्याला म्हणावे की, सुख दे. सुख मागितले की, त्यात सगळे आले. सुख मागत असताना परमेश्वराला सांगा की, असे सुख दे की, ज्या सुखात तू सदैव आमच्यासोबत असशील. परमेश्वर आपला गुरू आपल्यासोबत असेल तर, दुःखाच्या काट्यांवरून चालून मनुष्य सुखाच्या पर्वतापर्यंत पोहोचू शकतो, हे लक्षात ठेवावे. स्वामी सदैव पाठराखण करत असतात. पाठराखण करत असताना, स्वामी सदैव आमच्यासोबत राहा, हे मागा. स्वामी नक्कीच आपली पाठराखण करतील, असे सांगितले जाते.
|| श्री स्वामी समर्थ ||