संपूर्ण भारतभरात हजारो मंदिरे आहेत. अनेकविध देवदेवतांच्या मंदिरांमध्ये कोट्यवधी भाविक दररोज दर्शन घेत असतात. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये मूर्तीपूजेचे वेगळे महत्त्व आहे. बहुतांश घरांमध्ये दररोज अगदी न चुकता पूजा केली जात असते. आपले आराध्य, कुलदैवत अशा देवतांची मनोभावे पूजा केली जाते. मात्र, अनेकांना मूर्तीपूजन ही संकल्पना पटत नाही. निर्गुण, निराकार परमेश्वराला त्याच रुपात पूजावे, असा एक मोठा मतप्रवाह आहे. मूर्तीपूजेचा विरोध करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. परंतु, भारतभ्रमण करताना स्वामी विवेकानंदांनी एका राजाला मूर्तीपूजेचे महत्त्व पटवून दिले. जाणून घेऊया...
रामकृष्ण परमहंस यांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्याच आदेशावरून स्वामी विवेकानंद समाजसेवा करण्यासाठी देशाटनाला निघाले. असेच एकदा भ्रमंती करताना स्वामी विवेकानंद उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगल सिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य मोठ्या विलासात चालले होते. शिवाय त्यांच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता.
स्वप्न पूर्ण होवो न होवोत, स्वप्न पाहत राहा, तरच होतील ‘हे’ फायदे!
स्वामी विवेकानंदाना पाहून त्याला वाटले की, बोलून चालून हा एक तरुण संन्यासी! इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार? आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला की, स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे, असा प्रश्न राजाने स्वामीजींना विचारला.
राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले की, दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का? स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना थरथरायला लागले. रागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेहऱ्याकडे एकवार चोरट्या नजरेने त्यांनी पाहिले. स्वामी, असे कसे करता येईल? ते महाराजांचे चित्र आहे, असे दिवाणजी म्हणाले. यावर दिवाणजी, तो तर काळ्या शाईने रंगवलेला एक जाड कागद आहे, असे सांगत स्वामी विवेकानंदांनी आपली नजर राजांकडे वळवली.
एक स्वप्न तुटले म्हणून काय झाले, नवीन स्वप्न पहा आणि सत्यात उतरवा; वाचा ही सत्यकथा!
राजेसाहेब, त्या चित्रात अस्थी, मांस आणि जीव असलेली व्यक्ती नाही, म्हणून त्याला केवळ काळ्या रंगाने रंगवलेला जाड कागद असे म्हणणे जेवढे अविचारी आहे, तेवढेच मूर्तीत प्रत्यक्ष देव नसतांना तिला देव मानून तिची पूजा करणाऱ्यांची कीव करणे हेही तितकेच अविचाराचे आणि अविवेकी आहे. मूर्ती म्हणजे देव नव्हे, हे त्या मूर्तीची पूजा करणारे भक्त जाणतात; भगवंतांची पूजा करण्यासाठी कोणते तरी एक प्रतीक भाविकांसमोर असावे लागते.
निर्गुण, निराकार परमेश्वराची ध्यानधारणा करणे, ही सर्वसामान्य भाविकांना जमणारी गोष्ट नाही. सामान्य भाविकांना ईश्वरभक्ती करता यावी, यासाठी मूर्ती हे निर्गुण, निराकार असणाऱ्या भगवंताचे सगुण, साकार स्वरुप आहे. त्यामुळे मूर्तीपूजा ही केवळ प्रारंभीची एक पायरी आहे. यातूनच पुढे तो परमेश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करू शकतो, असा उपदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. स्वामीजींची शिकवण ऐकून राजा अंतर्मुख झाला. त्याची चूक त्याला पटली आणि तो स्वामींसमोर नतमस्तक झाला.