शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

BLOG: सरस्वती मावशीने दिलेली बॅग तशीच घेऊन गणपती कैलासावर परततो तेव्हा...

By देवेश फडके | Published: October 02, 2023 9:27 PM

कैलासावर घरी परतल्यावर यंदाच्या उत्सवाबाबत काय वाटले, यावर गणपती बाप्पाने टाकलेला स्पॉटलाइट...

- देवेश फडके

कैलासावर अगदी आनंदाचे वातावरण होते. पृथ्वीवरून दहा दिवसांचे आगत-स्वागत, मान-सन्मान, भरपूर खाऊ, मोदक-लाडू अशा अत्यंत आवडत्या पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घेऊन भाविकांची, भक्तांची गाऱ्हाणी, नवस, इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षांचे सामान सोबत घेऊन अखेर गणपती घरी परतणार, या खुशीत सर्व गण आनंदून गेले होते. पृथ्वीवरील माहेरपण संपवून गणपती परत घरी येतोय म्हटल्यावर आई पार्वती प्रसन्न चित्ताने त्याच्यासाठी चविष्ट पक्वान्न तयार करण्यात रमली होती. अनेक तास उलटले तरी गणपतीचा अजून काहीच पत्ता नाही. इतक्यात गणपती यायला हवा होता, या काळजीत गणमंडळी कैलासाच्या प्रवेशद्वाराशी ताटकळत बसली होती. काही गण येरझाऱ्या मारत होते, काही गण दर दोन मिनिटांनी प्रवेशद्वारावरून जिथपर्यंत दृष्टी जातेय, तिथपर्यंत नजर रोखून पाहत होते. तरीही गणपतीचा काही पत्ता नाही. अखेर बऱ्याच वेळेनंतर दूरवर काहीतरी हालचाल दिसली. वाट पाहत असलेले गण आनंदले. मूषकराजावर बसून गणपतीची स्वारी कैलासाच्या दिशेने हळूहळू येत आली. मात्र, गणपती कैलासाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू लागला, तसा गणांच्या चेहऱ्यावरील आनंदाची जागा भीतीने घेतली. गण अवाक् होऊन पाहत राहिले आणि क्षणाचाही विलंब न करता गणपतीजवळ गेले.

बिचारे मूषकराज गणपतीला घेऊन एकेक पाऊल पुढे टाकत वाटचाल करत होते. गण गणपतीजवळ पोहोचताच त्यांना धक्काच बसला. कारण, गणपतीचे असे रूप त्यांनी कधी पाहिले नव्हते. गणपतीचा चेहरा अगदी मलूल झाला होता. कान तर अगदी लालबूंद झाले होते. चेहऱ्यावरील तेज आक्रसले होते. गणपतीला थकला होता. मात्र, घराच्या ओढीने शक्य तितक्या लगबगीने आला होता. नेमके काय झाले, काय करावे, गणपतीची अशी अवस्था का झाली आहे, हे गणांना काहीच कळत नव्हते. पृथ्वीवरून परतताना गणपती पुष्कळ दमलेला असतो. मात्र, यंदा काही वेगळेच चित्र होते. क्षणाचाही विलंब न करता गणमंडळी गणपतीला उचलून थेट महालात पोहोचली आणि आई पार्वतीला गणपती आल्याची वर्दी दिली. गणपती आला म्हटल्यावर आईला आनंद झाला. तीही हातातील कामे बाजूला ठेवून घाईघाईने गणपतीकडे आली. तिलाही तितकाच धक्का बसला. माझ्या बाळाची काय अवस्था झाली आहे, असे पुटपुटून ती गणपतीजवळ आली. त्याला आधी मायेने जवळ घेतले. आईच्या त्या मायेच्या आलिंगनाने गणपतीही काहीसा सुखावला. “अरे, बाळा हे काय झाले रे...”, आईने काळजीने विचारले. परंतु, गणपती त्यावर काहीच बोलला नाही. गणपतीला ऐकू गेले नसावे, असा विचार करून पार्वतीने पुन्हा एकदा विचारले. पण तरीही गणपती काहीच सांगण्याच्या मन:स्थितीत नव्हता. अखेर पार्वतीने गणपतीला उचलले आणि सरळ स्नानगृहात नेऊन ठेवले. तिथे आधी डोक्यावर तेल घालून थोडी मालिश केली. कानात तेल घातले. डोळ्याला तेल लावले. सर्वांगाला उटणे, सुवासिक द्रव्ये लावली आणि कडकडीत पाण्याने स्नान करायला लावले. त्यानंतर गणपतीला लाडू-मोदक आणि तयार केलेली काही पक्वान्ने खायला घातली. आंघोळ होऊन थोडे खाल्ल्यावर गणपतीला जरा बरे वाटू लागले. त्याचा चेहरा पूर्वीपेक्षा तजेलदार दिसू लागला. गणमंडळींनाही हायसे वाटले. यानंतर आईने पुन्हा गणपतीची विचारपूस केली आणि गणपती मनोगत व्यक्त करू लागला...

आनंद, चैतन्यमयी वातावरणात अन् प्रचंड जल्लोषात स्वागत

गणपती सांगू लागला. आई, इथून जाताना माझ्या स्वागतासाठी सुरू असलेली जोरदार तयारी पाहत होतो. बाजार फुलले होते. माझ्या येण्याची लोक आतूरतेने वाट पाहत होते. जय्यत तयारी सुरू होती. घरी-दारी, मंडळांमध्ये विविध देखावे, सजावट साकारण्यात लोक व्यग्र होते. अखेर तो दिवस उजाडला आणि कोट्यवधी घरांमध्ये, मंडळांमध्ये विराजमान झालो. माझे पृथ्वीवर पाऊल पडले अन् सर्वच वातावरण अगदी चैतन्यमय झाले. लोकांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला. बच्चेकंपनीच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि अत्यानंद पाहिला आणि मीही भारावून गेलो. मुलांना म्हणजे काय करू आणि काय नको, असे झाले होते. त्यानंतर विधिवत माझे पूजन करण्यात आले. स्तोत्र, मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय झाले. हे सगळे पाहण्यात बच्चेकंपनी गढली होती. काय सुरू आहे, हे जिज्ञासेने, औत्सुक्याने पाहत होती. त्यानंतर आवडीचे पदार्थ, मोदक-लाडू-पेढे मला दिले आणि मीही त्याचा मनसोक्त आनंद घेतला. मला देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पदार्थांची चवच न्यारी होती. नेहमीपेक्षा ते अनेक पटीने उजवे होते. कारण देवाला द्यायचे म्हणजे ते सर्वोत्तम असले पाहिजे, अशी भाविकांची भावना. त्यामुळे अगदी कोणतीही कसर न ठेवता सगळे करण्यात आले होते. यानंतर भक्तिभावाने आरत्या झाल्या. प्रत्येकाने आपापल्या पद्धतींप्रमाणे केलेल्या आरत्यांनी मीही प्रसन्न झालो.  माझ्या जाण्याने मंडळीही अत्यंत सुखावली होती. मी असेपर्यंत काय काय करावे आणि काय नाही, असे मंडळींना झाले होते. मग घरोघरी जाऊन माझे दर्शन घेण्यात मंडळी रमली.

मंडळांची भव्यता आणि देखाव्याची विविधता

स्वागत, समारंभ झाल्यावर अन्य मंडळींप्रमाणे मीही सैर करायला निघालो. जगभरात फिरून आलो. कुठे काय चालले आहे, हे पाहिले. भाविकाच्या भक्तिभावाने, माझ्यावरील प्रेमाने मी अगदी भावनिक झालो. प्रत्येक जण आपले म्हणणे अगदी तळमळीने माझ्यासमोर मांडत होता. त्याच्या व्यथा सांगत होता, आनंदाच्या गोष्टी सांगत होता, मिळालेले यश, झालेली निराशा अगदी मनमोकळेपणाने कथन करत होता. कित्येकांना बाहेर काही बोलता येत नाही, आपले मन मोकळे करता येत नाही, ती सगळी जण मला अगदी भरभरून सुख-दुःखाच्या गोष्टी सांगत होती. प्रत्येकाच्या कथा-व्यथा शांतपणे ऐकून घेत होते. काही जण गाऱ्हाणी मांडत होते. काही ठिकाणी तर माझ्याशी उभा दावा करू लागले. भांडू लागले. पण ते भांडण प्रेमाचे, आपलेपणाचे आणि मी त्यांचा आहे, या भावनेतून आलेले होते. अनेक जण त्यांची कामे, इच्छा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून मला विनवण्या करू लागले. हे सगळे मी पाहत होतो, ऐकत होतो. मग म्हटले जरा घराबाहेर पडून मंडळांमध्ये काय चालले आहे, ते पाहून येऊ. पाहतो तर काय भव्य मंडप, भाविकांची प्रचंड गर्दी, माझ्या एका दर्शनासाठी चाललेली चढाओढ पाहून मी काही क्षण दचकलोच. पृथ्वीवर प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या काही मंडळांमध्ये तर माझ्या दर्शनावरून तुंबळ हाणामारी, अरेरावी, शिव्यांची लाखोली वाहिली गेली. नाना प्रकारचे मागणे मागितले जात होते. अमूक एका मंडळातील मी नवसाला पावतो म्हणून नवसांचा भडिमार चालला होता. पूर्ण झालेले नवस फेडण्यासाठीची रांग मात्र तुलनेने कमीच दिसली. ही बाब आता नित्याची झाली आहे, असा विचार करून देखावे पाहण्यात मी दंग झालो. आहाहा... यंदाच्या देखाव्यांनी तर औरच मजा आणली. कल्पकता, सर्जनशीलता, कौशल्य यांच्या सर्वोच्च अन् सर्वोत्तम परिपाकातून अप्रतिम देखावे सादर करण्यात आले होते. पृथ्वीवरून चंद्रावर पाठवण्यात आलेल्या यानाचे देखाव्यांनी यंदा बहार आणली. विविध प्रकारचे देखावे, कल्पकतेने केलेली साधी पण चांगली सजावट पाहून मलाही सर्वांचे कौतुक वाटले.

आई ही शेवटी आई असते

भाविक मला किती स्वरूपात आणि रूपात पाहतात, याची एक झलक यंदाही मला पाहायला मिळाली. स्वामी समर्थ, साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, पोलीस, माझे बालस्वरूप, माझे अन्य अवतार अशा नाना स्वरुपात भाविक मला पाहत होते. मूर्तीकारांनी अनेक स्वरुपात मला घडवले होते. माझे एक एक स्वरुप पाहताना सगळे जण अगदी हरवून जात होते. माझ्याकडे फक्त पाहत राहावे, असे सर्वांनाच वाटत होते. हे सगळे नित्यनेमाने सुरू होते. मात्र, जसे दिवस पुढे जात होते, तसा मीही काहीसा त्रासलो. माझ्यासाठी चाललेली धडपड आपलेपणाची असली तरी मलाही थोडा उबग आला होता. दिवसरात्र सुरू असलेल्या तांत्रिक दिव्यांनी डोळे दुखू लागले. तांत्रिक दिव्यांची तीव्रता सहन होत नव्हती. मंडळांमध्ये दिवसरात्र सुरू असलेल्या गाण्यांनी, मोठमोठ्या आवाजाने आजूबाजूच्या मंडळींप्रमाणे माझेही कान गरम होऊ लागले. कानावर पडणारा तीव्र ध्वनी अतिशय त्रासदायक वाटू लागला होता. माझे गोडवे गाणारी, कौतुक करणारी एकापेक्षा एक सुंदर गाणी सुरुवातीचा काही काळ आनंददायक वाटत असली तरी काही वेळातच प्रचंड त्रास होऊ लागला. हे सगळे सुरू असताना आई येतेय म्हटल्यावर मला हायसे वाटले. सगळे जण मग तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. आई, तुला पाहून मला किती आनंद झाला, हे शब्दातीत आहे. लांब गेल्यावर आईची किंमत कळते, या वाक्याची मला पदोपदी जाणीव होत होती. तू आलीस, तुला पाहिले अन् माझा सगळा क्षीण निघून गेला, सगळा त्रास मी विसरलो. तू असतानाचे तीन दिवस अगदी भूर्रकन गेल्यासारखे वाटले. तुझ्या आगमनाने जसे भाविक सुखावले, त्यापेक्षा जास्त आनंद मला झाला. तुझ्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी सर्वांची सुरू असलेली तयारी, धडपड, सज्जता पाहून मलाही बरे वाटले. 

निरोपाची वेळ आणि संमिश्र भावना

तांत्रिक दिवे, ध्वनिक्षेपकाचा कर्कश्शपणा पुढेही चालूच होता. मला निरोप द्यायची वेळ आली की, डॉल्बी डीजे, ढोल-पथक, बँजो यांचा अगदी भडिमार केला जातो. कित्येक तास माझ्या निरोपाच्या मिरवणुका काढल्या जातात. हेच लोक माझे मान ठरवतात आणि मानाचे म्हणून रांगेत उभे करून मला निरोप देतात. नेहमीप्रमाणे यंदाही कर्णकर्णश डॉल्बी डीजे, ढोल-पथक, बँजोवर यथेच्छ नाचून निरोप देण्यात आला. आमच्या पप्पांनी गणपती आणला, पार्वतीच्या बाळा, चिकमोत्याची माळ, हृदयी वसंत फुलताना, माई तेरी चुनरिया लहराए, केळेवाली मी, अंबेचे गोंधळी, झिंग झिंग झिंगाट, बुगू बुगू वाजतंय, लडकी आँख मारे, यम्मा यम्मा, तुम तो धोकेबाज हो, खैरियत पुछो, खैंके पान बनारस वाला, भारत का बच्चा श्रीराम बोलेगा, अगले बरस आना ही होगा, कोळीगीताच्या ढंगाची गाणी, रंगिलो म्हारो ढोलना, नवरात्रीच्या ढंगाची गाणी, आरत्या अशा नाना प्रकरच्या गाण्यांनी माझे कान किटले. परंतु, बच्चे कंपनीला अश्रू अनावर झाले होते. काही जण तर रडून धिंगाणा करत होती. काही जण मला घट्ट मिठी मारून बसली होती. हे पाहून मीही काहीसा हळवा झालो. बच्चेकंपनीप्रमाणे त्यांच्या घरातील मंडळी, अन्य भाविक मंडळींची अवस्था वेगळी नव्हती. पण, ते व्यक्त होऊ शकत नव्हते. प्रचंड प्रेम, आपुलकी, भक्तिभाव याकडे पाहून अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि माझाही प्रवास कैलासाच्या दिशेने सुरू केला. 

सर्व गणमंडळी, आई स्तब्ध होऊन दरवर्षीप्रमाणे यंदा काय घडले, हे ऐकत होते. तेवढ्यात आई गणपतीला म्हणाली, “काय रे? सरस्वती मावशीने दिलेली बॅग तशीच राहिली की काय?” यावर, गणपती उत्तरला की, काय सांगू आई तुला. सगळ्यांनी मला पृथ्वीवर जाता-जाता काही ना काही काही दिले. भक्तांच्या आशा, अपेक्षा, इच्छा पूर्ण करण्यासाठी भरभरून गोष्टी दिल्या होत्या. भाविक जसे जसे मागत गेले, तसे तसे मी त्या गोष्टी वाटत गेलो. पण, बुद्धी, विवेक, विद्या, ज्ञान हे कुणी जास्त मागितलेच नाही. त्यामुळे सरस्वती मावशीने दिलेली बॅग तशीच भरलेली राहिली आणि बाकी बॅगांमध्येही काही गोष्टी राहिल्या होत्या, त्या एकत्र केल्या आणि परत घेऊन आलो. बघू, किमान पुढच्या वर्षी तरी कोणी, याचा नवस बोलतो का ते...!!!

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...!!!

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव