ज्योत्स्ना गाडगीळ
अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हटले जाते. यंदा ३० ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. सायंकाळी ५. ४५ मिनीटांनी सरू होऊन दुसऱ्या दिवशी ८.१८ मिनीटांपर्यंत पौर्णिमेची तिथी असणार आहे. या दिवशी शक्य झाल्यास ब्रह्म मुहूर्तावर उठून महालक्ष्मी आणि लक्ष्मीपती विष्णू यांची पूजा करायची असते. धूप-दीप-गंधाक्षता वाहून श्रीसुक्त आणि विष्णुसहस्रनामाचे पठण करावे.
शरद पौर्णिमेची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वाधिक सुंदर रात्र म्हणून ओळखली जाते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळयात जवळ असतो. आजकाल नव्हे, तर वैदिक काळापासून आपल्या रसिक पूर्वजांनी वर्षातील सगळ्या रात्रींचे, सगळ्या पौर्णिमांचे नीट निरीक्षण करून या अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शारदीय पौर्णिमेचा बहुमान दिला. इतकेच नव्हे, तर याच पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी सुखसंपत्तीच्या वरदानाचे वाटप करत भूतलावर फिरते अशी रम्यतम श्रद्धा जनमानसात दृढ आहे. सर्वांनी जागे राहून या रात्रीचा रसिकतेने निरीक्षणाचा आनंद घ्यावा, असा त्यामागील हेतू आहे. जागे राहणे म्हणजे केवळ न झोपणे असे नाही, तर आपल्या कर्तव्याप्रती, कुटुंबाप्रती, समाजाप्रती, राष्ट्राप्रती, निसर्गाप्रती आपण जागृत असणे, महालक्ष्मीला अभिप्रेत असते. जो जागृत असतो, तोच आयुष्याचा भरभरून आनंद घेऊ शकतो. निसर्गाशी मैत्री करू शकतो. अशा शरद ऋतूचे कौतुक करताना आणि या रात्रीचे वैशिष्ट्य सांगताना ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात ज्ञानोबामाऊली म्हणतात,
आणि बरवा शारदु, शारदी पुढती चांदु, चंद्री जैसा संबंधु, पूर्णिमेचा।
सर्व चांगल्या गोष्टी एकत्र आल्यावर काय घडते, हे ज्ञानोबांनी या ओवीत सांगितले आहे. असेच आपल्याही आयुष्यात सर्वकाही चांगले घडावे, म्हणून कोजागिरीचे व्रत करावे, असे म्हटले जाते.
पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती, असे म्हणतात. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. म्हणून कोजागिरीला चंद्राला दूधाचा नैवेद्य दाखवतात आणि त्याची किरणे दूधात पडल्यावर ते दूध प्रसादरूपी ग्रहण करतात.
कोजागिरीच्या रात्री, द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त कोजागिरीला रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना या दिवशी केली जाते.
अनेक ठिकाणी कोजागिरीनिमित्त संगीतसंध्येचे आयोजन केले जाते. चंद्रावर आधारित गाण्यांनी कोजागिरीची सायंकाळ सुरेल होते. उगवला चंद्र पुनवेचा, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र आहे साक्षीला, चंद्रिका ही जणू, चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले, चांदण्यात फिरताना, तोच चंद्रमा नभात, लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, हे सुरांनो चंद्र व्हा...अशी कित्येक भावगीते आपल्या मनातही चांदणे शिंपडतात.
आकाशीचा चंद्रमा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली साथ देतो. आपण जाऊ तिथे आपल्या सोबत असतो. म्हणून बालपणी चांदोमामा म्हणत त्याच्याशी जडलेले नाते, प्रियकर-प्रेयसीचा दूत होण्यापर्यंत तो निभावतो. एवढेच नाही, तर वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यावर सहस्रचंद्रदर्शन सोहळा देखील त्याच्याच साक्षीने रंगतो. अशा चंद्राची शितलता आपल्या आयुष्यात व्यापून राहावी, हेच मागणे देवी शारदेकडे मागुया.
हेही वाचा : Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!