कोणाचे नशीब कधी पालटेल, सांगता येत नाही. रावाचा रंक आणि रंकाचा राव झाल्याची कित्येक उदाहरणे आपण पाहिली आहेत. तशीच एक कथा आहे, कोजागिरीच्या रात्रीची. ही कथा प्रचलित कथांपैकी एक आहे. त्या कथेकडे रुपक कथा म्हणून पाहावे आणि अर्थबोध करून घ्यावा. काय आहे ती कथा, पाहुया.
एक गरीब तरुण होता. त्याचे नाव होते ब्रह्मदत्त. तो बिचारा परिस्थितीने आणि स्वभावानेही गरीब होता. त्याचे लग्न झाले होते. त्याची बायको नेमकी त्याच्या विरुद्ध स्वभावाची! भांडखोर, कजाग आणि त्याच्या नावे सतत कटकट करणारी. नवीकोरी साडी-चोळी तर राहिलीच, साधे दोन वेळचे अन्न मिळण्याचीही मारामार होती. याच विषयावरू बायको ब्रह्मदत्तला सतत घालून-पाडून बोलत असे. एकदा असाच वाद झाला. दोघांचा पारा चढला. रागाच्या भरात ती नवऱ्याला खूप घालून पाडून बोलली. भांडणाच्या शेवटी तर तिने ब्रह्मदत्तला घरातून बाहेर हाकलून देत म्हटले, `ज्या दिवशी अन्न-धान्य, पैसा-अडका कमावून आणशील, तेव्हाच घरात यायचे. तोवर तुला घरात पाऊलदेखील ठेवू देणार नाही.'
ब्रह्मदत्तही रागाच्या भरात पाय आपटत आपटत निघाला. चंद्रप्रकाशात रात्र उजळून निघाली होती. गार वारा अंगाला झोंबत होता. तसाच तो चालत राहिला. कमरेला धोतर आणि अंगावर पंचा एवढ्या वस्त्रानिशी तो घराबाहेर पडला होता. समुद्राच्या दिशेने वाट काढत चालत जात असताना, त्याला स्त्रियांच्या हसण्या-खिदळण्याचा आवाज आला. एवढ्या रात्री या निबीड अरण्यात कोणाला हास्यविनोदाची लहर आली, म्हणून पाहतो, तर तीन सुंदर तरुणी सोंगट्यांचा डाव मांडून बसल्या होत्या. त्यांना चौथा साथीदार लागणार होता. ब्रह्मदत्त दुरून, झाडाआड लपून त्यांचा खेळ पाहत होता. एक-दोन खेळ पाहून झाल्यावर त्याला खेळाचे गमक उमगले. तेवढ्यात एका तरुणीचे त्याच्याकडे लक्ष गेले. तिने त्याला खेळायला बोलावले. थोडेसे आढेवेढे घेत ब्रह्मदत्त तिथे पोहोचला. मुलींनी त्याच्यासमोर खेळण्याचा प्रस्ताव मांडला. तशी यानेदेखी एक अट ठेवली. मुलींनी खेळ जिंकला, तर तो त्यांचा गुलाम व्हायला तयार झाला आणि मुली हरल्या तर त्यांनी ब्रह्मदत्ताच्या दासी व्हायचे.
मुली खेळात तरबेज होत्या. या तरुणाला काय येणार आहे, अशा विचारात त्यांनी डाव मांडला आणि ब्रह्मदत्त त्यांच्याबरोबर स्थानापन्न झाला. ब्रह्मदत्त आयुष्यात सोंगट्या खेळला नव्हता, परंतु त्या तिघींशी खेळात जिंकायचे त्याने ठरवून टाकले, कारण त्या तिघींच्या पेहरावावरून आणि राहणीमानावरून त्यांची श्रीमंती दिसत होती. त्या तिघी दासी झाल्या, तर त्यांच्या संपत्तीवर देखील आपालाच अधिकार असेल. त्यामुळे आपले दारिद्र्य दूर होईल आणि बायकोलाही आनंदात ठेवता येईल. या विचाराने ब्रह्मदत्तने एक-दोनदा लक्षपूर्वक पाहिलेला खेळ खेळायला सुरुवात केली. मुलींना वाटले, याला आपण सहज हरवून टाकू. या भ्रमात त्या बेसावध राहिल्या आणि ब्रह्मदत्त खेळाचा एक एक टप्पा जिंकत होता.
ती रात्र होती कोजागिरी पौर्णिमेची. देवीचे नाव घेत ब्रह्मदत्त आपले नशीब आजमावत होता. त्याच वेळेस महालक्ष्मी `कोण जागे आहे' पाहत आकाशमार्गे भ्रमण करत होती. थंडी, वारा, सोसून नेसल्या वस्त्रावर ब्रह्मदत्तचे लक्ष्मीप्राप्तीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असलेले पाहिले. ते पाहून महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने ब्रह्मदत्तच्या डोक्यावर वरदतहस्त ठेवला.
क्षणार्धात ब्रह्मदत्तचे नशीब पालटले. तो खेळात विजयी झाला आणि ठरवलेल्या नियमाप्रमाणे त्या तिघीही ब्रह्मदत्तच्या दासी झाल्या. त्या तिघींच्या वाटणीची संपत्ती ब्रह्मदत्तला मिळाली. ही वार्ता घेऊन ब्रह्मदत्त घरी आला. त्याची बायको खुश झाली. संपत्ती मिळालीच, शिवाय सेवेसाठी दासीही मिळाल्या. ब्रह्मदत्तला नशीबाचा हेवा वाटला. त्याने मनोमन लक्ष्मी मातेचे आभार मानले.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही एक रुपक कथा आहे. हतबल झालेल्या स्थितीत कोणीतरी सतत टोचणी दिल्याशिवाय, प्रतिकुल परिस्थितीचा सामना केल्याशिवाय आणि मनात दृढ निश्चय केल्याशिवाय ध्येय प्राप्ती होत नाही. या ध्येयाकडे नेणारी स्थिती म्हणजे जागृती. हे जागरण, देवी महालक्ष्मीला अपेक्षित आहे. आपणही ब्रह्मदत्तसारखे जागृत होऊया आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करूया.