Kojagiri Purnima 2023: नवरात्रोत्सवानंतर कोजागिरी पौर्णिमेचा सण साजरा केला जाईल. संपूर्ण देशभरात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, अशी मान्यता आहे. त्यामुळे ही पौर्णिमा सर्वांत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी चंद्रही आपल्या सोळा कलांनी पूर्ण असतो आणि अमृताचा वर्षाव करतो, असे म्हटले जाते. या दिवशी चंद्र देवाची पूजा करणे सर्वात शुभ मानतात. कोजागिरी पौर्णिमेला अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी चंद्रग्रहणही लागणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात कोजागिरी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारातील असेल. २८ ऑक्टोबर रोजी रात्री चंद्रग्रहण लागणार आहे. कोजागिरी पौर्णिमा असल्याने वेधकाळात रात्रीच्या वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध-सारखेचा नैवेद्य दाखवता येईल. मात्र, प्रसाद म्हणून एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसऱ्या दिवशी घेता येऊ शकेल, असे सांगितले जाते. कोजागिरी पौर्णिमा शुक्रवार, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०४ वाजून १७ मिनिटांनी प्रारंभ होत असून, शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०१ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होत आहे. भारताच्या जवळपास सर्व शहरांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोजागिरी पौर्णिमेला जुळून येत असलेले ५ शुभ राजयोग
शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी चंद्र आणि गुरुचा गजकेसरी योग, सूर्य आणि बुधाचा बुधादित्य योग, शनीचा शश योग, सौभाग्य योग आणि सिद्धी योग असे पाच शुभ योग जुळून येत आहेत. राजयोगाप्रमाणे याचा प्रभाव पडू शकतो, असे म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमा शुक्रवार, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०४ वाजून १७ मिनिटांनी प्रारंभ होत असून, शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०१ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होत आहे.
कोजागिरी पौर्णिमेचा व्रत पूजा विधी
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. व्रताचा संकल्प करावा. चौरंगावर भगवान सत्यनारायण, लक्ष्मी देवीचे आवाहन करून शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचार पूजन करावे. लक्ष्मी देवीची आवडती फुले, फळे अर्पण करावीत. खीर किंवा लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णूंच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर विष्णु सहस्त्रनाम पठण करा. तसेच या दिवशी चंद्राशी संबंधित मंत्र आणि देवी लक्ष्मीशी संबंधित मंत्रांचा जप करावा.