- शैलजा शेवडेकृष्णाचे रूप मनोहर, त्याच्या लीलादेखील अतिमनोहर! गोकुळातील सर्व लहान-थोरांचा अतिप्रिय कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत गाई चरायला वनामध्ये घेऊन गेला. तिथे ते सर्वजण खेळ खेळले. त्यानंतर सगळे जेवायला बसले. प्रत्येकाने आपापली शिदोरी काढली. भोजनपात्रे तर झाडांच्या पानांची आणि सालींची तयार करण्यात आली होती. कृष्णमय झालेली सर्व मंडळी कृष्णाच्या भोवती रिंगण करून जेवायला बसली. कृष्णही प्रत्येकाला घास देत आहे. किती हे सुंदर दृश्य...!मनमोहन तो, मधुसुदन तो, मधुभाषक तो म्हणतो,सकला, यमुनातट हा, रमणीय अहा,मऊ वाळूत या, इकडेच चला।फुलली कमळे, जळ निर्मळ हे, घनदाट किती,तरू ते इथले,गगनात थवे, खग सुंदर हे, वन गंधित हे, मनही रमले।जल प्राशुनिया, मग गोधन हे, चरतील तिथे हिरव्या कुरणी,अन् आपणही, करू भोजन ते, जवळीच इथे अतिरम्य वनी।रविही अगदी वर येत, असे अन् लागतसे मग भूक कितीमुरलीधर तो, हसुनी वदतो, मग गोप हसूनच हो म्हणती.घनश्याम मध्ये, अवती-भवती, बहुमंडल ते सगळे करतीमनमोहन तो नजरेत हवा, बसती म्हणुनी हरिसन्मुख ती।अरविंदच सुंदर ते फुलले, नलिनी दल ते जणु गोप गमे ,मुरलीधर शोभत कोशच तो, वन सर्वच ते खुलते, डुलते।व्रजबालक ते, मग हर्षभरे, चव दाखवती प्रिय त्या हरिसी,मग दे स्वभोजन, ते इतरा, अन् खात स्वत: अतिहर्षित ती।भरवी मनमोहन घास तयां, हरिरूपच ते मग गोपही बनतीवनभोजन हे अतिदिव्य असे, मग देवच विस्मय ते करती।कटिवस्त्रामध्ये वेणु आणिक, वामकक्षी ते शिंग नी वेत्रमोरपिसांचा मुकुट मस्तकी, कमळासम ते मोहक नेत्र,गोपबालकां प्रेमे देण्या, दही-भाताचा घास करतळी,हृदयी माझ्या अखंड राहो,मुरलीधराची मूर्त सावळी।
कृष्णाचे रूप मनोहर, त्याच्या लीलादेखील अतिमनोहर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 3:15 AM