Tirumala Tirupati Balaji Venkateshwar Laddu Prasadam Story: भारतात हजारो मंदिरे आहेत. पैकी दक्षिणेतील सर्वांत प्रसिद्ध आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणजे तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिर. तिरुमला तिरुपती देवस्थान येथे प्रसाद म्हणून मिळणारा लाडू जगप्रसिद्ध आहे. सध्या हे लाडू वादात अडकले आहेत. देवस्थानाकडून लाखो लाडू दररोज बनविण्यात येतात. लाडू प्रसादाच्या विक्रीतून मोठा महसूल देवस्थानला मिळतो. या लाडूला जीआय टॅग मिळाले आहे. या लाडूची ऑनलाइनही विक्री होते.
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
काजूगर, साखर आणि वेलचीचे ठरलेले प्रमाणच हवे आणि वजन तंतोतंत हवे. लाडू बनविण्यासाठी बेसन, साखरेचा पाक, मनुके आदींचाही वापर होतो. ६०, १७५ आणि ७५० ग्रॅम अशा तीन प्रकारच्या वजनांमध्ये लाडू मिळतो. प्रोक्तम् प्रकारातील लाडू साधारणतः ६० ग्रॅमचे असतात. बहुतांश भाविकांना हेच लाडू दिले जातात. तसेच आस्थानम् प्रकारचे लाडू सणासुदीला तयार होतात, तर कल्याणमहोत्सवम् मध्ये मिळणारा लाडू हा कल्याणमहोत्सवम् मध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठीच तयार केला जातो. ३ ते ५ लाखांपेक्षा जास्त लाडू दररोज बनविण्यात येतात. ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल लाडूविक्रीतून देवस्थानला मिळतो. १५ दिवस हे लाडू टिकतात. ५० रुपयांत मध्यम आकाराचा एक लाडू मिळतो. २०० रुपयांत मोठ्या आकाराचा एक लाडू मिळतो. सन १७१५ पासून तिरुपती येथे प्रसाद म्हणून लाडू देण्यात येत आहे. २०१४मध्ये लाडूला जीआय टॅग मिळाला होता. लाडू प्रसादम् याबाबत अनेक लोककथा प्रचलित आहेत.
बालाजी व्यंकटेश्वर देवावर कुबेराचे कर्ज
तिरुमला तिरुपती मंदिराच्या अनेक अद्भूत गोष्टी सांगितल्या जातात. तसेच अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या विवाहाशी संबंधित एक कथा आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान व्यंकटेश्वराने कुबेर यांच्याकडून कर्ज घेतले होते. हे ऋण आजही भाविक फेडत असल्याचे मानले जाते. विशेषत: लाडू प्रसाद या ऋणाशी संबंधित आहे. भक्त देवाला दान देतात आणि त्या बदल्यात प्रसाद रूपात लाडू घेतात. लाडू प्रसाद हा या ऋणाशी निगडीत आहे, कारण तो परमेश्वराच्या भक्तांना आशीर्वाद म्हणून दिला जातो. त्या बदल्यात भक्त त्यांच्या श्रद्धेनुसार दान करतात.
लाडू प्रसाद अद्भूत कथा
तिरुपती मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसादाची आणखी एक कथा सांगितली जाते. तिरुपती बालाजी मंदिरात व्यंकटेश्वराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती, तेव्हा देवाला काय अर्पण करावे हे पुजाऱ्यांना समजत नव्हते. त्याचवेळी एक वृद्ध आई लाडू असलेले ताट घेऊन आली आणि नैवेद्य म्हणून हे लाडू अर्पण करण्यास सांगितले. पुजाऱ्यांनी लाडू देवाला अर्पण केले आणि नंतर प्रसाद म्हणून ग्रहण केले. लाडू इतके अप्रतिम चविष्ट होते की, पूजा करणाऱ्याला आश्चर्य वाटले. मग वृद्ध आईला लाडू कसे बनवायचे ते विचारले. वृद्ध आईने लाडू कसे बनवायचे ते सांगितले. काही क्षणातच अंतर्धान पावली. या घटनेनंतर असे मानले जाते की, देवी लक्ष्मीने स्वतः लाडू नैवेद्य अर्पण करण्यास मदत केली होती. तेव्हापासून हे लाडू तिरुपती बालाजीमध्ये बनवले जाऊ लागले.
सर्व मनोकामना पूर्ण होतात
तिरुपती लाडू खूप शुभ आणि पवित्र मानले जातात. असे मानले जाते की, या प्रसादाचे सेवन केल्याने भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. तिरुमला तिरुपती लाडू हा व्यंकटेश्वर बालाजी देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. तिरुपती लाडू हा केवळ स्वादिष्ट प्रसादच नाही तर त्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. बालाजी व्यंकटेश्वरांकडून प्रसाद म्हणून लाडू ग्रहण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी ती स्वीकारण्यामागील भाविकांची श्रद्धा आहे.