पौष शुक्ल द्वादशीला सुजन्मद्वादशी असे एक नाव आहे. ज्या वर्षी पौष शुक्ल द्वादशीला ज्येष्ठा नक्षत्र येते त्या वर्षी या तीथीला व्रताचा प्रारंभ करावा, असे सांगितले आह़े पुढे वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल द्वादशीला भगवान विष्णूंची पूजा करावी. व्रतकर्त्याने एकादशीसारखा द्वादशीला उपवास करावा. दान करावे आणि फलाहार करावा, असे व्रताचे स्वरूप असते.
पौषामध्ये द्वादशीला ज्येष्ठा नक्षत्र असेल, तेव्हा घृताचे दान अर्थात तुपाचे दान आणि केवळ गोमूत्र प्राशन करून उपवास सांगितला आहे. तर एरव्ही पौष शुक्ल द्वादशीला तांदळाचे दान करून केवळ पाणी पिऊन राहावे, असा नियम आहे. सर्व इच्छांची पूर्ती व्हावी, घराण्यात मान मिळावा, लक्ष्मीचे कृपाछत्र सदैव लाभावे, अशा विविध फुलांच्या लाभासाठी हे व्रत केले जात असे.
प्रगतीच्या वाटा मर्यादित असलेल्या पूर्वीच्या काळी देव आणि दैव या दोन्हीवर समाजाला अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आता संधीची नवनवीन दालने रोज उघडत आहेत. प्रगतीसाठी आवश्यक असे अनुकूल वातावरण साऱ्यांनाच उपलब्ध झालेले आहे. प्रगती करणे, पैसा कमवणे, सुखसोयी प्राप्त करून घेणे सोपे नसले तरीही प्रयत्नाने मात्र सहज शक्य झाले आहे. त्यामुळे माणूस आशा, आकांक्षा आणि कर्तृत्व या तिन्हीच्या सहाय्याने पुढे जाऊ बघतो आहे. म्हणूनच केवळ व्रत वैकल्ये, उपास, नवस अशा कर्मकांडांपासून समाज विचारपूर्वक काहीसा दूर गेला आहे. माणसाच्या मनात श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धेपासून तो स्वत:ला दूर ठेवण्याएवढा विचारी झाला आहे. म्हणून सांप्रतच्या काळात `सुजन्मद्वादशी' सारखी व्रते कालबाह्य होताना दिसतात. त्यातच या व्रतातील दानविधी तसेच स्वत: व्रतकर्त्याने सेवन करावयाचे पदार्थ हेदेखील आजच्या काळात कोणाला शारीरिक दृष्ट्या पेलवणारे नाही. उदा तूपाचे दान सर्वांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. तसेच गोमूत्र पिऊन संपूर्ण दिवस उपास करणे हेही शक्य नाही.
पौष शुक्ल द्वादशीला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे कूर्मद्वादशी. नारायणासाठी घृत भरलेला कलश, एक कासवाची आणि एक मंदारपर्वताची अशा दोन मूर्तींसह दान देण्याचा विधी या तिथीला सांगितला आहे.
भगवंताच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार हा कूर्मअवतार मानला जातो. इतर अवतारांमध्ये कोणत्या न कोणत्या दैत्याच्या संहारासाठी भगवंतांनी अवतार घेतल्याच्या कथा आहेत. मात्र कूर्मावताराचे कारण वेगळे आहे. भागवत पुराणानुसार समुद्रमंथनाच्यावेळी मंदारपर्वत पाताळात गेला त्यावेळ भगवंतांनी कूर्मरूप घेऊन त्याला वर उचलून आपल्या पाठीवर घेतले. नंतर कूर्मरुपातील भगवंत क्षीरसागरात शयन करते झाले.
या कथेचा संदर्भ लक्षात घेऊन कूर्मद्वादशीचे व्रत योजले असावे. या निमित्ताने भगवंताच्या कूर्मअवताराची आठवण, हाही हेतू असेल. एकादशीप्रमाणे द्वादशी देखील विष्णूंची प्रिय तिथी मानली जाते. ज्यांना शक्य आहे. त्यांनी निदान पितळ्याचे वा लाकडाचे सुंदर कासव आपल्या स्नेह्याला या दिवसाची आठवण म्हणून द्यावे. किंवा भगवान महाविष्णूंचे स्मरण करावे.