नुकतीच शारदीय नवरात्र सुरू झाली असून १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. हा दिवस ललितापंचमी नावे साजरा केला जातो. पाचव्या दिवशी देवीच्या मातृवत्सल रूपाची पूजा केली जाते. माता लालन-पालन करते, म्हणून तिला ललिता म्हटले आहे. आई आपल्या मुलाचे वाईट कधीच चिंतू शकत नाही. असे म्हणतात, `कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति' अर्थात संतती वाईट असू शकते, परंतु आई कधीच वाईट नसते. म्हणूनच तिला प्रेमरूपिणी, प्रेमांकित जननी म्हटले आहे. यावरून बालपणी सांगितलेली एक गोष्ट आठवून पहा.
एक मुलगा अतिशय खोडकर असतो. कोणाची मस्करी कर, कोणाच्या खोड्या काढ, कोणाच्या वस्तू पळव अशा सगळ्या त्याच्या वाईट सवयी. रोज शाळेतून त्याची तक्रार आईच्या कानावर पडत असे. आई त्याची समजूत काढते, चांगले संस्कार घालते परंतु एक चूक करते. लोकांसमोर त्याचा अपमान होऊ नये म्हणून पाठीशी घालते. त्याच्या चुका पदरात घेते. मात्र, आईच्या चांगुलपणाचा मुलगा फायदा घेत एवढा बिघडतो, की मोठेपणी तो गावगुंड म्हणून ओळखला जातो. आई त्याची मनधरणी करते. त्याला सन्मार्गाला लावू पाहते. परंतु, हाताबाहेर गेलेला मुलगा आईचे ऐकूनही घेत नाही. एकदिवस गावात मारामारी होते, त्यात मुलाच्या हातून रागाच्या भरात खून होतो. पोलिस त्याला बेड्या ठोकतात आणि तुरुंगात टाकतात. आई रडत-ओरडत तुरुंगात पोहोचते. पोलिसांना विनवण्या करून मुलाची भेट घेते. त्याच्यासमोर खूप रडते. मात्र, पाषाणहृदयी मुलावर काहीच परिणाम होत नाही. भेटण्याची वळ संपते. त्याआधी मुलगा आईला जवळ बोलावतो आणि काहीतरी सांगण्याच्या निमित्ताने तुरुंगाच्या दाराच्या सळ्यांमधून आत आलेला आईचा कान कचकचून चावतो. आई विव्हळते. ओरडते. तिच्या कानाला रक्ताची धार लागते. ती आश्चर्यचकित होऊन मुलाकडे पाहते, त्यावर मुलगा तिला म्हणतो, `माझ्या चुका पदरात घेण्यापेक्षा वेळीच मला दोन धपाटे घातले असते, तर आज मी तुरुंगात नसतो.' तात्पर्य, मुले कृतघ्न होऊ शकतात, आई नाही! म्हणून आईनेही आपल्या मुलांना प्रेम आणि जोडीला शिस्त लावलीच पाहिजे! म्हणून ललितामातेचा आदर्श! ती समस्त जगावर वात्सल्यतेचे छत्र धरते, परंतु चुकांची शिक्षा भोगण्यासाठी रखरखीत उन्हाचे चटकेही देते. आपले मूल आत्मनिर्भर व्हावे, सुशिक्षीत, सुसंस्कृत व्हावे, हे प्रत्येक मातेचे स्वप्न असते.
अशा आईचा गौरव, सन्मान, पूजा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्रीत देवीच्या विविध रूपांमध्ये मातृरूपाचाही गौरव केला जातो. आपणही कृतज्ञ होऊन आपल्या तीन मातांपुढे नतमस्तक होऊया. एक, जिने आपल्याला जन्म दिला, ती आपली आई. दुसरी, जी आपले पोषण करते, ती मातृभूमी आणि तिसरी, जिने आपल्याला आश्रय दिला, ती भारतभूमी. यांच्याप्रती सदैव अभिमान बाळगून त्यांचे नाव उज्ज्वल करण्याचे दान ललिता मातेकडे मागुया...!
जगदंबऽऽऽ उदयोस्तु!