'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात?' गोट्या मालिकेचे हे शीर्षक गीत आजही आपल्या मनात रुंजी घालते. या गीताचा मुखडा आपल्याला मोठी शिकवण देऊन जातो. ती शिकवण कोणती, हे आध्यात्मिक वक्ते गौर गोपाल दास प्रभू यांच्या शब्दात समजून घेऊ.
एक मुलगा अतिशय मेहनती असतो. परंतु अपयश त्याच्या पाचवीला पुजलेले असते. तो जेमतेम पदवीपर्यंतचे शिक्षण घेतो आणि अपार कष्ट घेऊनही काठावर पास होतो. योग्य वयात त्याच्या घरचे त्याचे लग्न लावून देतात. सुदैवाने याबाबतीत त्याचे भाग्य त्याला साथ देते. त्याला अतिशय गुणी पत्नी मिळते.
लग्नानंतर जबाबदारी वाढल्याने तो नोकरीसाठी धडपड करू लागतो. परंतु जिथे रूजू होतो, तिथे दोन ते तीन महिन्यांच्यावर टिकत नाही. बायको धीर देते. तो पुन्हा प्रयत्न करतो. लहान मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करतो. परंतु मुलांना सांभाळण्याचे, शिकवण्याचे कसब आणि अनुभव त्याच्याकडे नसल्यामुळे तो नोकरीतून काढला जातो.
आपल्या वाट्याला आलेली अवहेलना आणखी कुणाच्या वाट्याला येऊ नये, म्हणून लहान वयातच मुलांना सुयोग्य पद्धतीने घडवावे, असे त्याला मनापासून वाटते. त्याच्या निर्णयाला त्याची बायको दुजोरा देते. तो मूक बधीर मुलांना शिकवण्याचे प्रशिक्षण घेतो आणि काही काळातच स्वत:ची छोटीशी शाळा काढतो. एका खोलीत सुरू झालेल्या त्या शाळेला छान प्रतिसाद मिळतो. त्याचा हुरूप वाढतो. तो आणखी एक शाखा उघडतो. तिथेही यश मिळते. लोकांची विचारणा होऊ लागते. आपल्या शिक्षण कौशल्याला वाढती मागणी पाहून तो अनेक शाखा उघडतो आणि जोडीलाच मूकबधीर मुलांसाठी यंत्र विकायला सुरुवात करतो. त्याची या व्यवसायावर एवढी घट्ट पकड बसते, की पाहता पाहता तो अब्जाधीश होतो. अनेक पुरस्कारांनी गौरवला जातो. तेव्हा एक दिवस बायकोला विचारतो,
'माझ्या पडत्या काळात, मी अपयशाने पार गर्भगळीत झालेलो असताना तू एवढी खंबीर कशी राहिलीस? तुझ्यात एवढा धीर, सकारात्मकता, आत्मविश्वास कुठून आला?'
यावर स्मित हास्य करत नवऱ्याचा हात हातात घेत बायको म्हणाली, `हा आत्मविश्वास मला तुमच्या कर्तृत्वातून मिळाला. तुमची धडपड मी पाहिली. तुमची मेहनतीची तयारी पाहिली. ज्याची कष्ट करण्याची तयारी असते, तोच कितीही अपयश आले, तरी पुन्हा उभा राहू शकतो. कोणतीही जमीन टाकाऊ नसते. त्यात योग्य बी पेरावे लागते. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न, प्रयोग सातत्याने करावे लागतात. तुम्हाला जमीनित गहू घ्यायचा आहे? लागवड करा. पिक आले नाही, तर धान्य पेरून पहा. धान्य उगवले नाही, तर भाज्या पेरून पहा, भाज्याही उगवल्या नाहीत, तर फुलाची शेती करून पहा. एखादे तरी बियाणे त्या जमीनीच्या गर्भात नक्कीच रूजेल. तुम्ही वेगवेगळी बियाणे पेरून पाहिलीत. एक बियाणे रुजले, फोफावले, भरघोस पिक आले. यात श्रेय तुमच्या मेहनतीचे आहे. मी फक्त तुम्हाला वेळोवेळी धीर दिला.'
बायकोचे शब्द ऐकून ती व्यक्ती भारावून गेली. हेच धीर देणारे शब्द प्रत्येकाला आयुष्यात हवे असतात. या शब्दांना प्रयत्नांची जोड मिळाली, तर ओसाड जमिनीवरही बाग फुलायला वेळ लागत नाही.
'बीज अंकुरे अंकुरे' या गीतातून कवी मधुकर अरकडे यांनादेखील बहुधा हीच गोष्ट आपल्या मनात रुजवायची असेल...!