Last Shravan Ravivar Shivratri 2024: काही दिवसांनी श्रावण महिन्यांची सांगता होत आहे. श्रावण हा शिवपूजनासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो. विशेष म्हणजे श्रावण महिन्याची सांगता होत असताना, सलग दोन दिवस शिवपूजन करण्याचे भाग्य लाभणार आहे. श्रावणी रविवारी शिवरात्री असून, श्रावणी सोमवारी सोमवती अमावास्येचा शुभ योग जुळून आला आहे. या अद्भूत संयोगाने शिवपूजनाचे पुण्य लाभू शकते, असे म्हटले जात आहे. श्रावणी रविवारी असलेल्या शिवरात्री व्रताचे महत्त्व, महात्म्य आणि काही मान्यता जाणून घेऊया...
हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीला खूप महत्त्व आहे. दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला शिवरात्री असते. शिवरात्रीला भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. यंदा २०२४ मध्ये श्रावणी रविवारी मासिक शिवरात्री आहे. या दिवशी आदित्य पूजनही केले जाणार आहे.
शिवरात्री: रविवार, ०१ सप्टेंबर २०२४
श्रावण चतुर्दशी तिथी प्रारंभ: रविवार, ०१ सप्टेंबर रोजी पहाटे ०३ वाजून ४० मिनिटे.
श्रावण चतुर्दशी तिथी सांगता: सोमवार, ०२ सप्टेंबर रोजी पहाटे ०५ वाजून २१ मिनिटे.
भारतीय पंचांगनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच शिवरात्री व्रत निशिथकाली केले जात असल्याने श्रावणातील शिवरात्रीचे व्रत रविवार, ०१ सप्टेंबर २०२४ रोजी करावे, असे सांगितले जात आहे.
शिवरात्री व्रतपूजनाचा विधी
शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन अभिषेक करणे शुभ मानले गेले आहे. मात्र, घरातील शिवलिंगावर बेलपत्रासह अन्य पत्री अर्पण करू शकता. शक्य असेल तर भगवान शंकराचा रुद्राभिषेक करावा. भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे.
श्रावणी रविवारी करा आदित्य पूजन
सूर्योपासनेचे महत्त्व अधोरेखित करणारे हे व्रत आहे. श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. सूर्यदर्शन कधीतरी घडते. अशावेळी कोवळी उन्हे अंगावर घेता यावे, तसेच सूर्यपूजेचे महत्त्व सांगणारेही हे व्रत आहे. श्रावणातील रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे. या दिवशी सूर्याचे पूजन करावे. अर्घ्य अर्पण करावे, असे सांगितले जाते. श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते.